करोना... आम्ही तितके स्वच्छ, बाकी सारे तुच्छ

Update: 2020-03-13 05:22 GMT

कचऱ्याचा डबा न्यायला दिनू आला तेव्हा सोसायटीतल्या मँडम दूरसे म्हणुन किंचाळल्या. त्यांच्या डोळ्यासमोर करोना चमकला असावा. एरवी दिनू यांचे टॉयलेट, बाल्कनी, पाण्याच्या टाक्या वरचेवर साफ करून देतो. आज तो " अस्वच्छ" गटात गेलाय. त्याचं असणं गलिच्छ, घाणेरडं झालंय...

आज लोकांसाठी दक्ष असलेल्या यंत्रणेने गटाराच्या टाकीत, शौचालयांमध्ये पडून मेलेल्यांसाठी ग्लोव्हज, मास्क साबण दिले नाही म्हणून वाईट वाटल्याचं आठवत नाही. वैयक्तिक स्वच्छता समाजातला अमुक एक वर्गच राखतो आणि मैला घाण उकरायची सार्वजनिक स्वच्छतेची कामं अमक्याच वर्गातल्या, बाप मेल्यावर अनुकंपावर चिकटलेल्याच पोरांनी करायची? वाह भाई..

करोना च्या निमित्तानं आपलं सामाजिक वर्तन अनेक पातळ्यांवर उघड पाडू शकतं😌 काळजी घ्या.

पोरांना खाऊ घालून जेवायला बसलेली आई त्याच पोराला दोन नंबर लागली म्हणून परत उठते हात धुवून परत जेवण पूर्ण करते. ती आपल्यातली कुणी असते.

रुग्णालयाच्या स्वच्छताविभागातले, शस्रक्रिया विभागातले अनेक कर्मचारी कापलेल्या अवयवांचे तुकडे पिशव्यात भरून डम्पिगला पोहचवतो. त्यातलं एक गर्भपात केलेलं भ्रूण मांजर ओढून बाहेर काढतं नाही तोवर आपल्याला मळमळत नाही, त्या माणसांचं जगणं कळतं नाही.

एरवी बाहेरगावहून आलेल्या मित्रांची दारू चालते पण आज त्याला तू सगळ्या टेस्ट केल्यास का हे विचारण्याची हिंमत होत नाही. त्याच्या पोराबाळांसोबत खेळू नका हे सांगायला मात्र विसरत नाही. घरात कुणी महिनोमहिने बेडरिडन असेल तर त्याचं हगणंमुतणं काढलेल्या माणसांची अन्नावरची इच्छा उडते. दुर्धर आजारातल्या माणसांना आधार देणारे, एरवी सेवाभावी उल्लेख होणाऱ्या माणसांना मात्र सोयीनं टाळलं जातं.

घरात दोन शौचालयं असणाऱ्यांना मॉलच्या समोरचे टॉयलेट घाण वाटते. खबरदारी घ्यायचा सबक करोनाने दिलाय, पण स्वत: च्याच स्वच्छतेचे निकष योग्यचा आग्रह धरून दुसऱ्यांना दूर लोटणाऱ्यांचेही मुखवटे हा विषाणू दाखवेल! #आम्हीतितकेस्वच्छबाकीसारेतुच्छ #करोना

-Sharmila Kalgutkar

 

 

Similar News