सोनियाचा पिंजरा..

Update: 2020-05-05 12:23 GMT

सुलभा (नाव बदलले आहे) माझी बारावीपर्यंतची वर्गमैत्रीण. आमच्या 'अ' आणि 'ब' तुकडीत नेहमी टॉपर असायची. शाळेतील विविध स्पर्धेत तिचा सहभाग. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असली की तिचं परिपाठाला भाषण ठरलेलं. त्यामुळे बोलण्यात निर्भीड होती. मैत्र/मैत्रिणीच्या वादविवादात बिनदास्त बोलायची. कोणताही मुलगा किंवा मुलगी तिच्याशी पंगा घेत नव्हता. अन्याय सहन करणं तिच्या रक्तात नव्हतचं. अभ्यासू आणि डँशिंग असे दोन्ही गुण तिच्यात होते. आणि तेवढीच सुंदर देखील. म्हणजे सर्वगुणसंपन्न. यामुळेच वर्गातील मुलं (माझ्यासह) तिच्यावर खूप मरायचे पण ती कोणाला भाव देत नसायची.

कॉलेजला गेल्यावर मात्र आमची चांगली मैत्री झाली. तिची सोबत मला हवी होती. त्यामुळे प्रपोजच्या भानगडीत पडलो नाही. बारावीनंतर आम्ही वेगळे झालो. पुढील शिक्षणासाठी ती पुण्याला गेली तर मी औरंगाबादला. कॉलेजच्या सुट्टीत एखाद्या वर्षी आमची भेट व्हायची. पण त्या भेटीत औपचारिकपणा आला होता. ग्रँज्वेशननंतर तिने एमबीए करण्याचं ठरवलं होत. दुसऱ्या वर्षात असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. ते नामवंत वकील होते. वडीलांच्या मृत्यूनंतर 'एका वर्षाच्या अगोदर लग्न करावं लागतं नाहीतर तीन वर्षे लग्न करता येत नाही.' या लिखीत नियमामुळे सुलभाला एमबीए सोडून लग्नाच्या बोहल्यावर चढाव लागलं.

आज अचानक सुलभाची आठवण होण्याचं कारण म्हणजे, तिचं लग्न झाल्यापासून चार ते पाच वर्षांनी आम्ही पुन्हा भेटणार होतो. कोरोना व्हायरसच्या भीतीने ती गावी आली होती. सकाळीच आईने सुलभा आल्याचे सांगितले. त्यामुळे मोठ्या उत्साहात मी आटोपलं आणि तिला भेटण्यासाठी गेलो. ती दारातील झोपाळ्यावर बसून झोका घेत होती. बाजूला आठ-नऊ महिन्याचे बाळ बाटलीने दूध पीत होतं. एकेकाळच्या टॉपर, डँशिंग आणि सुंदर मुलीचं एका पारंपरिक स्त्रीमध्ये रूपांतर झालं होतं. साऱ्या जगाच ओझं तिच्या खांद्यावर असल्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती. क्लासमधील टॉपर मुलींचं पुढं काय होतं ? हे अनेक वर्षांपासून न उलगडणार कोडं माझ्यासमोर होतं.

मला बघून तिला आश्चर्य वाटलं असावं. 'अरे कुठं असतोस ? अन् कसा आहेस ?' तिने एका दमात दोन प्रश्न विचारले.

'मज्जेत आहे. पंधरा दिवसापूर्वी आलोय. नगरमध्ये जॉब करतोय.' मी उत्साहात सांगितले. 'आणि तू कधी आलीस ?'

'आज सकाळीचं' स्वतःला सावरत ती म्हणाली.

'तुझे मिस्टर नाही आले ?'

'आले होते, आत्ताच अमरावतीला (तिचं सासर) गेले.'

'अच्छा ! मला यायला थोडा उशीरचं झाला.' मी म्हणालो. 'नाही रे ! ते गरबडीत होते, त्यामुळे लगेच गेले.' ती कृत्रिम हसत म्हणाली,

कोरोना व्हायरस हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असू शकतो, असा संशय तिने आमच्या झालेल्या चर्चेत व्यक्त केला. तिला कुणीतरी व्हाट्स अपवर गिरीश कुबेरांचा व्हिडीओ पाठवला होता. त्यानंतर गाव, शाळा आणि कॉलेजच्या आठवणी निघाल्या. कोणाचं काय चाललंय वगैरे वगैरे.. काकू लिंबू सरबत घेऊन आल्या. त्यांनी फ्रिजमधील पाण्याने सरबत बनवला असावा. गरजेपेक्षा थंड होता. (फ्रिज म्हणजे शहरी लोकांची चैन असा एकेकाळी समज होता. पण तो हळूहळू बदलत गेला.) तेवढ्यात श्रेयाला (तिची मुलगी) घेऊन काका आले. तिच्या हातात कॅटबरी चॉकलेट होती.

'ते गेल्यापासून नुसती रडतीय. ऐकतच नाही. नुसती लाडावून ठेवलीय'. सुलभा संतापत म्हणाली.

'जाऊदे गं, शेवटी लहानचंय ती, तुझ्यासारखीचं हट्टी दिसतीय'. तिने श्रेयाला जवळ घेतलं आणि 'हॅलो' बोलायला सांगितले. बोबड्या आवाजात 'हॅलो अंकल' म्हणाली. अन् खेळायला गेली. आमच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या. 'लग्न कधी करतोस ?' सुलभा म्हणाली.

'यावर्षी विचार होता. पण कोरोनाने खोळंबा केला.'

'अच्छा, पण तू माझ्या लग्नाला आला नव्हतास ना ?'

'तुझ्या लग्नादिवशी माझं फायनल सबमिशन होतं, त्यामुळे नाही जमलं.' मी खोटं कारण सांगून दिलं.

'तुझ्या लग्नावेळी बघू आम्हीपण', ती हसत म्हणाली.

विषय बदलत मी म्हणालो, 'अर्धवट राहिलेलं एमबीए लग्नानंतर पूर्ण का केलं नाहीस ?' या प्रश्नाने सुलभाचा चेहरा पडला. 'जाऊ दे, त्याविषयी न बोललेलं बरं.' सुलभा तिच्या बाळाकडे बघत म्हणाली.

'काय झालं ?' सुलभा काहीतरी लपवत होती. त्यामुळे मी पुन्हा विचारले.

'तसं तर शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्याची इच्छा नव्हती. आई, मामा आणि काकांनी ऐकलं नाही.' सुलभाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

'हो, पण लग्नानंतर पुढे शिकायचे ?' मी म्हणालो.

'लग्नानंतर सासूबाईना आजी होण्याची घाई झाली होती. एखाद मुलं झाल्यानंतर शिक म्हणाल्या.'

सुलभाची सासू सामाजिक कार्यकर्त्या आहेत. नाट्य क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी निमंत्रण असतात.

'अरे पण तुझ्या मिस्टरांकडे हट्ट धरायचा ना?' मी म्हणालो. 'त्यावरून आमचं खूप भांडण झालं होतं. त्यांनी नकार दिला म्हणून सासूबाईंना विचारले ?'

'तुझ्या शिक्षणाला मिस्टरांचा का विरोध आहे ?'

'आता शिकून जॉब करणार आहेस का ? मी कमवत आहे ना. अन् मुलांना कोण सांभाळणारे ? त्यांच्या या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे नव्हती. तरीही मी आग्रह धरला. तीन-चार दिवस आमचं बोलणं बंद झालं होतं. शेवटी मलाच माघार घ्यावी लागली.'

सुलभाच्या डोळ्यातील पाण्याने जागा सोडली आणि तिच्या गालावरून वघळू लागले.

'आता सासूबाईंना मुलगा हवा आहे. दोन मुली झाल्याने त्या नाराज आहेत.' सुलभा म्हणाली.

'पुण्यात मोठा बंगला आहे. पण दिवसभर रिकामा असतो. ते रात्री घरी उशिरा येतात. सासूबाई कधीतरी असतात. मी आणि कामवाली आम्ही दोघीचं घरी असतो.' काहीवेळ ती शांत बसली. कोणी काहीच बोललं नाही.

'माझं जीवन म्हणजे सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्षासारखं झालंय बघ. कॉलेजमधले दिवस आठवल्यावर दिवस दिवस रडत असते. मला समजून घेणार कोणीच नसतं. एवढं शिकून माझ्या शिक्षणाचा उपयोग काय ? एमबीएपर्यंत शिक्षण घेऊन आज कामवाली सोबत भांडे घासते.' त्यानंतर सुलभा बरंच काही सांगत होती. सासूबाईचे टोमणे, नवऱ्याचं ड्रिंक करणं वगैरे वगैरे... काहीवेळ थांबून मी तिचा निरोप घेतला. 'पुण्याला आल्यावर घरी ये' जाताना तिने घरचा पत्ता दिला. तिने श्रेयाला आवाज दिला. अंकलला बाय कर म्हणाली. तिने पुन्हा बोबड्या शब्दात बाय केला.

रस्त्याने चालताना सुलभाचा विचार करत होतो. घर कधी आले समजलं नाही. 'भेटली का सुलभा?' आई म्हणाली. 'हो भेटली' मी उत्तरलो. 'बघ तुझ्या बरोबर शिकत होती. लग्न झालं, लेकरंबाळं झाले. कल्याण झालं पोरीचं.' आई म्हणाली. मी तसाच आतल्या रुममध्ये गेलो. आई आपली बडबड करत होती. मला काम होत नाही. किती दिवस नको नको म्हणतोस..? वगैरे वगैरे... सुलभाचं चित्र माझ्या डोक्यातून जात नव्हती.

नाटक, चित्रपट आणि कथामधून शिकारी नेहमी खलनायक रंगवला आहे. तो जगासाठी खलनायक असला तरी त्याच्या कुटूंबासाठी नायक असतो. त्यामुळे इतर लोकांना शिकाऱ्याबद्दल सहानभूती वाटत नाही. मात्र त्याचं शिकार करणं पोटासाठी असतं. पण काही शिकारी हौसी असतात. त्यांच्याकडे सोन्याचा पिंजरा असतो. त्यामध्ये अडकलेली शिकार त्यांच्या घरची शोभा असते. त्यातीलचं एक सुलभा. "हे फक्त एका सुलभाचं दुःख नाही. तिच्या सारख्या असंख्य सुलभा सोन्याच्या पिंजऱ्यात अडकल्या आहेत. पण सुलभाने कोणी वाटसरू येईल आणि तिच्या पिंजऱ्याचे दार उघडेल याची वाट का पहावी ?"

प्रशांत शिंदे

(लेखक पत्रकार आहेत)

Similar News