लॉकडाऊन: पॅनडेमिक ते इन्फोडेमिक पर्यंतचा प्रवास

Update: 2020-05-07 12:40 GMT

लॉकडाऊनच्या तिसरा टप्पा हातावर पोट असणार्‍यांसाठी अत्यंत अटीतटीचा प्रसंग म्हणून पाहावयास मिळत आहे. यातून संसर्गजन्य महामारीमुळे जनसामन्यांच्या मनात अनेकविध प्रश्न आहेत हे सकृतदर्शनी दिसून येते. यातून हे प्रश्न एका विशिष्ट धर्माबद्दल अधिक प्रमाणात असल्याचेही प्रत्यक्ष काम करत असताना समोर येत आहे. याची सुरुवात झाली लॉकडाऊनच्या पहिल्या कालावधीत.

तबलीगला राज्यात परवानगी नाकारली असताना आयोजकांना दिल्लीत परवानगी दिली गेली. वास्तविक पाहता एका ठिकाणी परवानगी रद्द केली आहे. तर, दुसर्‍या राज्यात परवानगी देण्याची आणि परवानगी घेण्याची गरज नव्हती. वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखणे गरजेचे होते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. यानंतर अनेक बातम्या, पोस्ट याचा पेव फुटलेला होता. धार्मिक तेढ पसरविणारा कोरोनाविषयी अंधश्रद्धा पसरवू नये. असे केल्यास संबधित व्यक्ति, ग्रुप अॅडमिन यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे पत्रक पोलिस प्रशासनाकडून काढण्यात आले. मात्र ह्या लॉकडाऊनच्या काळात जनसामन्यांच्या मनात एखाद्या धर्माविषयी जातीविषयीचा द्वेषाणू वाढताना दिसत आहे.

Courtesy : Social Media

कोरोना रुग्णाचा गुणाकार सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने 'ऑड ईवन फॉर्म्युला' लागू केला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला, दूध, फळ विक्रेते यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा ठिकाणी आलेले हे अनुभव- शहरातील उच्चभ्रू लोकांची कॉलनी. चार भाजीच्या गाड्या उभ्या होत्या त्यात एका भाजीच्या गाडीवर स्त्री-पुरुष दोघांचीही गर्दी होती. या दोन्ही गाड्यावर सारख्याच भाज्या होत्या. त्यामुळे जिथे गर्दी नव्हती तिथे भाजी आणि अजून एका महिलेने भाजी घेतली. त्यावेळी त्या महिलेचा दुसर्‍या महिलेने सांगितले की, आज तू तिच्याकडून भाजी घेतली पण परत घेऊ नकोस. आमच्या भाजीवाल्या मावशीने सांगितले आम्ही आपल्या लोकांकडूनच माल खरेदी करतो पण तिचं तसं नाहीये. आज तर तिने मुस्लिम माणसाकडून माल खरेदी केला आहे. आपल्याला काय माहीत ते माल कोठून आणतात, आणि कसा ठेवतात.

प्रातिनिधीक चित्र

असाच अनुभव फळ विक्रेत्याच्या बाबतीत आढळून आला. लॉकडाऊन पूर्वी सकाळी १० वाजेनंतर गाडी लावण्याची त्याची वेळ होती. सध्या सकाळी ७ ते ११ अशी सगळी आवश्यक दुकाने सुरू आहेत. नियमित त्याच्याकडे फळे घेणार्‍या लोकांनी पाठ फिरवली. त्यावर फळ विक्रेत्या सांगत होता लोकांच्या मनात मुस्लिम हा रोग पसरवतात ही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे माझ्याकडे नियमित फळे घेणारे लोकही आता फळे घेत नाहीये. फळ विकले गेले नाही तर घर कसे चालवायचे? माल विकले गेला नाही तर बेभाव विकावा लागतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. रमजानचा महिना आहे. मुलांना बाकीच काही नाही तर किमान पोटभर खाऊ तरी घालता आलं पाहिजे. याची काळजी त्याला होती.

Courtesy : Social Media

लॉकडाऊनने कष्टकरी समुदायातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त आणि मुस्लिम अशा सगळ्याच लोकांची उपजीविका अडचणीत आणली आहे. यातून मनात एखाद्या धर्माविषयी अढी ठेवून समाजातील मोठा जनसमूह वावरत असेल तर ह्या अडचणी अजून वाढणार का याबद्दलची भीती मनात निर्माण होते. मुळात जेव्हा आपल्या घरात भाजी किंवा कुठले फळ येते किंवा आपण आणतो तेव्हा आपण ज्यांच्याकडून खरेदी करतो ती व्यक्ति त्या भाजी किंवा फळाबद्दल जे सांगेल तेवढीच माहिती गृहीत धरून खरी मानतो. कोणाच्या शेतातून, कोणत्या गावातून, राज्यातून की दुसर्‍या देशातून, कोणत्या व्यापार्‍याकडून आलेले आहे याची मूळ माहिती आपल्या नसते. ते फळ किंवा भाजी कशी पिकवली आहे त्यावर कोणते बियाणे खते वापरले हे माहीत नसते. नैसर्गिक /सेंद्रिय आहे की प्रक्रिया करून पिकवले आहे हेही माहीत नसते. तरीही एखाद्या व्यक्तीकडून हे फळ, भाजी खरेदी करू नये कारण ती अमुक एका धर्माची आहे हा संदेश दुर्दैवाने सगळीकडे पसरलेला असतो.

कोरोना संसर्गजन्य आजार आहे. पॅनडेमिक महामारी सोबत "इन्फोडेमिकही "बनत आहे. पॅनडेमिकवर वर्ष सहा महिन्यात लस मिळेल पण इन्फोडेमिकवरची लस या देशात स्वांतंत्र्याची सत्तरीपार केली तरी अजूनही सापडत नाहीये हे पोस्ट लॉकडाऊननंतरचे खऱ्या अर्थाने चॅलेंज म्हणून आपल्या सर्व भारतीयांच्या समोर असेल.

  • युसूफ बेन्नुर

(लेखक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजकार्य शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत.)

Similar News