Earth Day : जगासाठी चिंतन केलं पाहिजे - सुनेत्रा पवार

Update: 2020-04-22 14:40 GMT

संपूर्ण जग आज एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. कोरोना विषाणू नावाच्या संकटामुळे जवळपास संपूर्ण जग थांबलंय. लोक आपापल्या घरात बंद आहेत. जवळपास संपूर्ण पृथ्वीवर हे संकट आलंय आणि दुसरीकडे मानवाच्या सर्व हालचाली थांबल्यामुळे पर्यावरणाच्या स्तरावर अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत. यमुना नदी स्वच्छ झाल्याचा रिपोर्ट आजच वर्तमानपत्रांमध्ये आहे. वर्ल्ड इकॉनॉमीक फोरम च्या अहवालात म्हटलंय की, जगातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. यामुळे वायुप्रदुषणाचा धोका टळेल याची शक्यता नाही, मात्र मानवीय हस्तक्षेप थांबला की काय होऊ शकतं याचे बरेच नमूने अभ्यासक आणि शास्त्रज्ञांना या काळात जरूर मिळत आहेत.

हवेतील प्रदूषणामुळे जगभर दरवर्षी ४० लाख लोक मरतात, वायुप्रदुषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा तर तिसरा नंबर लागतो. प्रदूषणामुळे जगातील अनेक देशांमध्ये श्वसनाच्या विकारांनी लोक त्रस्त आहेत. कोविड-१९ चा सर्वाधिक फटका श्वसनविकारांनी ग्रस्त लोकांनाच बसला आहे. त्यामुळे वायुप्रदूषण आणि कोविड-१९ चा परस्पर संबंध आपल्याला लक्षात येईल.

हे ही वाचा

PositiveNews: महाराष्ट्रात ‘या’ 4 जिल्ह्यांनी जिंकली कोरोना ची लढाई…

लॉकडाऊन : मासे विक्रेत्या महिलांचा कठीण काळ

आज पृथ्वीने जरा विश्रांती घेतलेली असली तरी ती तात्पुरती आहे. सध्याचं संकट बघता दीर्घकालीन उपाययोजनांनी गरज निर्माण होणार आहे. कोरोनानंतरचं जग भयानक असणार आहे. जगाच्या अर्थकारणाला एमर्जन्सी ब्रेक लागला आहे. उत्पादन ठप्प आहे, शेतीची कामे रखडलीयत, व्यापार-उदीम थांबलाय. अख्खं जग घरात बसल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या आधी पाण्याचा वारेमाप उपसा झालेला आहे. अन्न-धान्याची टंचाई यापुढच्या काळात जाणवू शकते. गोर-गरीब जनतेच्या हातून रोजगार गेलाय. आपल्याशिवाय जग चालत नाही-चालणार नाही हा माणसाचा अहंकार धुळीला मिळालाय. अशा परिस्थितीत एक नवीन जग आकाराला येऊ शकतं.

जगातील सर्व प्रमुखांनी या जगासाठी चिंतन केलं पाहिजे. पृथ्वी वाचली तर जीवन वाचेल. कोरोना सारखी आणखीही अनेक संकटं या पुढच्या काळात येतील. आज हवेतला व्हायरस आहे, उद्या पाण्यातला येईल तेव्हा आपण काय करणार आहोत, याचा ही विचार झाला पाहिजे.

आझ वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने आपणही या गोष्टीचं चिंतन सुरू करूया. कोरोनाच्या या संकटातून आपण, आपला परिवार सुखरूप बाहेर पडो, ही वसुंधरा ही या संकटातून सहीसलामत बाहेर पडो, आणि एका नवीन जगाची सुरूवात होवो, हीच प्रार्थना

- सुनेत्रा पवार यांच्या वॉलवरून

Similar News