कौटुंबिक हिंसाचार – परिस्थिती कशी बदलेल?

Update: 2020-06-04 04:16 GMT

महिला हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करताना; हिंसा कशी कमी होणार? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. मुलींनी मुलींसारखं वागलं तर त्यांना त्रास होणार नाही असंही सुनावलं जातं. म्हणजे काय तर पितृसत्तेच्या नियमांप्रमाणे वागलं तर तुम्ही सुरक्षित, पण हेच पितृसत्ताक नियम विषमता निर्माण करतात, स्त्रियांना असुरक्षित बनवतात हे लक्षात ठेवायला हवं.

शारीरिक दृष्ट्या बाई आणि पुरुषाकडे वेगळ्या पण परस्परपूरक भूमिका आहेत. मात्र हा वेगळेपणा म्हणजे विषमता नव्हे. माणसे म्हणून आपण समान आहोत. पण दमन/शोषणाची कोणतीही व्यवस्था फार चतुर असते.

उदा. मुलीला मुलाच्या तुलनेत कमी महत्व द्यायचं, तिचं लग्न करायचं तर हुंडा द्यावाच लागेल अशी व्यवस्था निर्माण करायची आणि मग हुंडा द्यायला लागतो म्हणून मुलीच नको या टोकापर्यंत जायचे. विवेकी-प्रगतीशील समाज म्हणेल; आमच्या मुली आम्हाला प्रिय आहेत, हुंड्यासारख्या प्रथा बंद व्हायला हव्यात. पण दुर्दैवाने मुलींचा जीव घेतला जातो मात्र अशा प्रथा बंद होत नाही.

आम्ही आमच्या मुलीला मुलग्यासारखंच वाढवलं आहे, असं अनेक पालक म्हणतात. म्हणजेच मनात कुठेतरी मुलगा श्रेष्ठ ही भावना असते. हे लिंगभावाचे साचे सैल झाले तर परिस्थिती बदलू शकेल. लिंगभाव म्हणजे gender म्हणजे बाईने आणि पुरुषाने कसे वागावे /जगावे याबद्दलचे समाजाचे नियम आणि अपेक्षा.

एखाद्या लहान मुलीला काही भेट द्यायची आहे तर तुम्ही बाहुली/भातुकली देता आणि मुलगा असेल तर गाडी/बंदूक. बारकाईने बघा, त्या छोट्यांचं ट्रेनिंग तुम्ही सुरु केलं आहे. खरेतर घरकाम, स्वयंपाक, गाडी चालवणे, बँक व्यवहार, बिले भरणे वगैरेकडे ‘जीवनकौशल्य’ म्हणून पहायला हवं; बाईचं किंवा पुरुषाचं काम म्हणून नाही. मुलग्यांना बाहुली-भातुकली तर मुलींना मैदानी खेळ खेळू द्यावे. घरकाम आणि अर्थार्जनासाठी मुलामुलींना सक्षम करायला हवे. लिंगभावाधारित भूमिकांना चिकटून न राहता, मुलामुलींचा कल असेल त्याप्रमाणे शिकण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.

शिस्तीच्या नावाखाली केलेली मारहाण हिंसेचं समर्थन करते त्यामुळे हिंसा नकोच. वाढत्या वयातल्या मुलामुलींशी संवाद हवा, लैंगिकताविषयक जबाबदार शिक्षण हवे. नकार पचवायला मुलांना शिकवायला हवे. घरात स्त्रियांचा आदर केला जातो, घरातले निर्णय स्त्रिया-पुरुष सदस्य मिळून घेतात हे पहात मुलं मोठी झाली तर तीही प्रौढपणी तसे वागतील.

मुलग्यांना ‘रडतोस काय पोरीसारखा मुळूमुळू’ किंवा मुलींना ‘काय पोरासारखी वागतेस ग’ अशा प्रकारे साच्यात बसवू नये. त्यांना मोकळं जगू-वाढू देणे गरजेचे. पितृसत्ताक मानसिकतेतून चांगली स्त्री (आज्ञाधारक, त्यागी इ.) किंवा मर्द (न रडणारा, आक्रमक इ.) या तथाकथित आदर्शांपेक्षा मुला-मुलींनी जबाबदार, संवेदनशील नागरिक बनणे महत्वाचे. अशी माणसे घडली तर परिस्थिती नक्की बदलू शकते. अर्थात महिला हिंसाचाराकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलायला हवा, त्याबद्दल पुढच्या समारोपाच्या लेखात जाणून घेऊ या.

- सायली ओक, प्रीती करमरकर

narisamata@gmail.com

Similar News