CoronaVirus: एका महिला पत्रकाराचं मनोगत

Update: 2020-04-12 10:55 GMT

हॅलो,

पत्रकाराने अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं..सोशल मिडियासारखं साधन कसं वापरायचं ? जबाबदारीनं. तेच करण्याचा प्रयत्न आज लॉकडाऊन वाढेपर्यंतच्या काळापर्यंत केलं. सतत आशावाद पेरणाऱ्या बातम्या या वॉलवर शेअर केल्या. नकारात्मक खूप काही घडतंय.. ते जाणीवपूर्वक या वॉलपासून दूर ठेवलं.

बाहेर काहीच दिसत नसताना ही मिणमिणती आशा माणसाला मूळांशी घट्ट धरून ठेवते, चिवट जगण्याची जिद्द देते . ते खरंही आहे. पण कधीतरी वास्तवाचंही भान द्यावं लागतं. त्याने क्वचित कुणाचा बीपीही वाढतो, ताण येतो. पण जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा पाहते, माणसं अन्न वाढणाऱ्यांच्या अंगावरही धावून जातात. पोरं गल्लीत क्रिकेट खेळताना, हसताना टाळ्या देताना दिसतात.. रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोक वॉकला जातात. भाज्या कधी आयुष्यात बघितल्या नाहीत अशा पद्धतीने गर्दी करतात. त्यांना ही सगळी गंमत वाटते. मागे थाळीनादाच्या वेळी मी फ्रस्टेट झाले होऊन लिहलं होतं.

आज मी शांत, भक्कम स्थिर आहे. मन घट्ट आहे.

बाहेर जे दिसतं, जे कळतंय ते वास्तवदेखील तुमच्यापर्यंतही यायला हवं. आमच्या सगळ्यांच्या बातम्यांमधून ते तुम्हाला कळतंही आहे. पण आजपासून पुढचा काळ शिस्तीत पाळला नाही तर मस्तीत जगायला संधी मिळणार नाही, हे मनाशी पक्कं धरून चाला. ही वेळ सांभाळली तर आपण तरू हे लक्षात ठेवायला हवं.

लॉकडाऊन उठला म्हणजे करोना संपणार नाही.. तो कधीपर्यंत राहणार हे आता छातीठोकपर्यंत सांगता येत नाही. आकड्यांचा ,मृत्यूंचे प्रमाण पाहिले या क्षेत्रातले तज्ज्ञ संसर्गाचं प्रमाण मे अखेरीपर्यंत वाढत जाईल असं सांगतायत. प्रत्येक विषाणूचा एक पीक असतो. लॉकडाऊन पाळला तर पीक तोडता येईल. साखळी तोडायची असेल तर त्याला कमीतकमी संपर्क मिळायला हवा. नाही तर तो फोफावणार, भस्म्यासारखा.. स्वाईन आला तेव्हा तो पसरला त्यानंतर स्थिरावलाही. आज स्वाईनचे रुग्ण सापडत नाहीत का, तर प्रत्येक वर्षी सापडतात. प्रतिकारशक्ती शरिरात तयार झाली.

आतापर्यंत गमजा करत लॉकडाऊन पाळला, तसा यापुढचा काळ नसेल, विनाकारण दिसलात तर पडतील याची खात्री बाळगा. तशा सूचना देण्यातही आल्या आहेत. वाट्टेल तितके नुकसान सोसून करोनापासून आपल्या प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर तयारी सुरु आहे. आपल्याला फक्त घरी राहायचं आहे. सतत वेगाशी स्पर्धा करणाऱ्यांसाठी ते कठीण आहे. ज्यांचं पोट हातावर आहे, डोक्यावर छप्पर नाही त्यांच्यासाठी ते महाकठीण आहे याची सतत जाणीव आहे. पण आता दुसरा इलाज नाही..

आज जगलो तर उद्या आहे, ही परीक्षा वेगळ्या पद्धतीची आहे, संयमांची, आहात तिथेच थांबण्याची.

करोनाच्या रूग्णांवर उपचार सुरु आहेत अशा रूग्णालयातल्या आयसीयूमध्ये ड्युटी लागलेल्या एका डॉक्टर मैत्रीणीशी बोलत होते. रोज बोलतो रात्री उशिरा..

आज तिचा आवाज खोल गेला होता. एरवी ती खळाळता झरा..काय ग काय गं. म्हणत मी तिला दोनदा हलवलं..

ती म्हणाली..

आज दोन जण डोळ्यापुढे गेले. चांगले होते आले तेव्हा, एकदम आयसीयू..फारच खचल्यासारखं झालं.

ही माझी सोर्स नाही, वैद्यकीय क्षेत्रातील जवळची मैत्रीण आहे. तिने अनेक वेदना केवळ फोनवरच्या शब्दांनी सुसह्य केल्या आहे. जवळच्या अशा कुणाला हताश पाहिलं, ऐकलं की आपलाही धीर खचतो. तो पुन्हा बांधावा लागतो. त्याला इलाज नसतो. समजावतं, सांगत पुढे जावं लागतं.

कुणाला तरी लढावं लागतं, कुणाला तरी मरावं लागतं, कुणाला तरी भोगावं लागतं, तेव्हा कुणीतरी जगतं..यातलं मरण ओढावून घेऊ नका..यातला आपला चॉइस काय आहे हे आपण आतापर्यंत ठरवलं असेल. #choiceisyours

Similar News