सोने फक्त एक धातू की प्रेस्टिज इश्यू...

Update: 2020-07-26 00:11 GMT

काल कुठेतरी न्यूज पाहिली सोन्याचे दर ५० हजार वर वगैरे. बरं झालं म्हटलं. एक अतिशय ओव्हररेटेड धातू. जो फक्त इनव्हेस्टमेंटच्या कामाचा. गरज पडल्यास मोडून पैसे उभा करू शकेल असा.. एवढचं..

बाकी सोन्यावरून लग्नाच्या बाजारात जे आकांड तांडव होतात ते बरेचदा पाहिलेत, त्यामुळे सोने हा अतिशय नावडता विषय माझा. मुलीला इतकं सोनं घातलच पाहिजे किंवा आमच्या घरची लक्ष्मी तर आम्ही तिला अस्स सोन्याने मढवणार (४ लोक बघतात आणि यांच सो कॉल्ड प्रेस्टिज वाढत ना म्हणून ) अशी वक्तव्ये प्रचंड हास्यास्पद वाटतात मला.

मुलीच्या सासरच्यांनी इतकं सोन मागितलंय म्हणून घर गहाण ठेवणाऱ्या व्यक्ती असतात. कधी कधी तर एकुलती एक मुलगी तिला सोन्याने मढवूनच सासरी पाठवणार म्हणूनही घरं जमिनी विकून पैसे उभे केले जातात. कधी एकीला एवढं घातलं मग पाठीमागच्या बहिणींनाही घातलं पाहिजे म्हणून त्या मुलींनाही मढवून पिवळं केलं जात. पण आयुष्यभर आई बाप कर्जाचे डोंगर उपसताना काळे ठिक्कर पडतात.

मुलीबरोबर जावयालाही म्हणे सोन घालावं लागतं.. म्हणजे हे तर अतीच. मी म्हणते स्वत:च्या पोराला स्वत: घालाव की त्याच्या आई वडिलांनी एवढा हौसेचा कोंबडा आरवत असेल तर, नाही का.. मुली मुळात अशा अपेक्षा असणाऱ्या स्थळांना दारात तरी कसं उभं करून घेतात? मुलीच्या वडिलांना एवढं आकाश पाताळ एक करून अक्षरश: मुलगी खपवायलाच हवी अशा मनस्थितीला जायची काय गरज असते?

सोनं किंवा काहीही हुंडा देणारच नाही, या भूमिकेला ठाम नाही राहू शकत का मुलीचे आई वडिल? आत्ताच्या काळात मी हुंडा घेणार नाही अस मुलगा निक्षून नाही सांगू शकत का? तर दुसरीकडे मुलींच्या सासवांमध्ये वेगळीच कॉम्पिटिशन असते बरं का. ‘माझी सून एवढं सोन घेऊन आली, अगं बाई तुझ्या सूनेनं एवढचं आणलं होय’, अशी.. मग नंतर त्या सूनेच्या नावान उध्दार करतील पण इथे मात्र स्टेटस सिंबॉलचा प्रश्न यू नो..

कोणत्याही समारंभाला गेलं की एकमेकींच्या गळ्यात, हातात, कानात बघणाऱ्या बायका मला प्रचंड विकृत वाटतात. ‘किती तोळ्याचं गं, खरंय का, की बेंटेक्स, कधी केल’, असले प्रश्न ऐकायला मिळतात. त्यातही फक्त कौतुक किंवा चौकशी नसते, तर इथेही स्टेटस सिंबॉल. त्यात एखादी माझ्यासारखी खोटं नाट काहीतरी घातलेली किंवा काहीच दागिना नाही अशी असेल की ‘हाव शॅड’ असा लूक दिला जातो. दागिन्यांवरून हिचा नवरा एवढं कमवत असेल असा अंदाज लावतात म्हणे या बायका... लाईक सिरियसली??

तिच्या नवऱ्याने तिला एवढ्याचा हार केला मग मलाही पाहिजे, हे असं का असत? फक्त मला पाहिजे म्हणून नाही, तर तिच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे ही मानसिकता का?

काही बायका तर पोटाला न खाता सोन्यासाठी पैसे साठवतात, का गं बाई, गाठोड घेऊन वर जाणारेस काय असं विचाराव वाटत अशांना.. एकतर त्या सोन्यामुळे इतक्या चोऱ्या होतात, जीव जातात, मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचे प्रकार घडतात तरीही बायका नखशिखांत सोन्याने मढून बाहेर पडायच काय सोडत नाहीत..

एकंदरित अवघडे.. पण आपल्याला काय ना त्याच.. आपुनको तो सोना मंगता..

  • सई मनोज

Similar News