घटस्फोटानंतर स्त्रीला पुन्हा ‘स्वतःला सिद्ध’ का करावं लागतं?
सामाजिक stigma, एकटं मातृत्व आणि नव्याने उभं राहणं
घटस्फोट: निर्णय कमी, निर्णयावरचा निकाल जास्त
घटस्फोट म्हणजे दोन माणसांमधलं नातं संपणं. पण समाजासाठी तो स्त्रीच्या चारित्र्यावर, क्षमतेवर आणि मूल्यांवर दिलेला निकाल ठरतो. काय झालं असेल? तिच्यातच काहीतरी दोष असेल हा संशयचा धागा लगेचच तिच्याभोवती गुंडाळला जातो.
पुरुषासाठी घटस्फोट हा आयुष्यातला एक टप्पा असतो; स्त्रीसाठी मात्र तो ओळख बनतो. तिचं नाव, काम, व्यक्तिमत्त्व याआधी घटस्फोटित स्त्री हा शिक्का येतो.
‘तूच निभावू शकली नाहीस’ — दोष नेहमी तिचाच का?
लग्न मोडलं की फार क्वचित दोघांनाही समान प्रश्न विचारले जातात. स्त्रीलाच विचारलं जातं तू adjust का नाही केलंस? थोडं सहन करता आलं नसतं का? जणू काही नातं टिकवणं ही तिची एकतर्फी जबाबदारी होती.
हिंसा, दुर्लक्ष, मानसिक छळ, अपमान या सगळ्यांना घरगुती गोष्टी ठरवलं जातं. पण घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर स्त्रीच दोषी ठरते कारण तिने बाहेर पडायचं धाडस केलं.
सामाजिक stigma: न दिसणारी पण कायमची सावली
घटस्फोटानंतर स्त्रीचं आयुष्य खुलेपणानं जगणं कठीण होतं. लोकांचा दृष्टिकोन बदलतो तो सहानुभूतीचा कमी आणि संशयाचा जास्त असतो.
ती एकटी आहे हा विचार अनेक गैरसमजांना जन्म देतो.
तिच्या कपड्यांपासून ते बोलण्यापर्यंत सगळ्याच मोजमाप जातं. जणू काही समाजाच्या सुरक्षिततेसाठी आता तिला अधिक ‘मर्यादित’ राहावं लागणार आहे.
एकटं मातृत्व: दुहेरी लढाई
घटस्फोटानंतर बऱ्याचदा मुलं आईकडे असतील, तेव्हा तर तिची परीक्षा आणखी कठीण होते. एकटं मातृत्व म्हणजे फक्त आर्थिक जबाबदारी नव्हे ती भावनिक, मानसिक आणि सामाजिक लढाई असते.
आई म्हणून तिला सतत सिद्ध करावं लागतं की तिचा निर्णय मुलांसाठी चुकीचा नव्हता. वडील नसल्यामुळे मुलांवर परिणाम होईल ही भीती समाज तिच्या मनात ठासून भरतो.
ती कामावर गेली तर दोष तीचाच, मुलांसाठी थांबली तर दोष तीचाच. कोणताही मार्ग तिला ‘परिपूर्ण’ ठरवत नाही.
आर्थिक स्वावलंबन असूनही असुरक्षितता
घटस्फोटानंतर अनेक स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. पण समाज त्याकडे दुर्लक्ष करतो. एकटी स्त्री म्हणजे असुरक्षित हा समज इतका खोलवर आहे की तिच्या यशालाही तो झाकोळतो.
घर भाड्याने घेताना, शाळेत, नोकरीच्या ठिकाणी तिला सतत स्वतःची स्थिती स्पष्ट करावी लागते. नवरा नाही हे तिचं अपयश ठरवलं जातं.
पुन्हा नात्यांचा प्रश्न: परवानगी कोण देणार?
घटस्फोटानंतर स्त्रीने पुन्हा नात्यात पडणं अजूनही समाजाला अस्वस्थ करतं. मुलं आहेत ना? आता कशाला? असे प्रश्न विचारले जातात. जणू काही प्रेम, सहवास, आधार या गरजा तिच्यासाठी संपलेल्या असतात.
पुरुषाने पुढे जाणं सहज स्वीकारलं जातं; स्त्रीने केलं तर तिच्या चारित्र्यावरच चर्चा होते. इथेच स्पष्ट होतं की तिला ‘स्वतःला सिद्ध’ का करावं लागतं.
स्त्री स्वतःशी झगडत राहते
सगळ्यात कठीण लढाई समाजाशी नसते, तर स्वतःशी असते. सततचे प्रश्न, टोमणे, तुलना यामुळे स्त्री स्वतःलाच दोष देऊ लागते. मीच चुकले असेन का? हा विचार तिच्या आत्मविश्वासाला पोखरतो.
नव्यानं उभं राहताना तिला स्वतःला एक व्यक्ती म्हणून परत ओळखावं लागतं.
नव्यानं उभं राहणं म्हणजे विसरणं नव्हे
घटस्फोटानंतर पुढे जाणं म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नव्हे. तो अनुभव सोबत ठेवून, त्यातून शिकून, स्वतःसाठी वेगळी वाट निवडणं हेच खरं धैर्य आहे.
स्त्री जेव्हा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहते, तेव्हा ती समाजाला आवडत नाही. पण तीने स्वतःला सावरणं हेच महत्त्वाचं असतं.
समाज बदलायला स्त्रीनेच का त्रास सहन करावा?
आजही घटस्फोटानंतर स्त्रीने अधिक चांगली, अधिक जबाबदार, अधिक शांत राहण्याची अपेक्षा असते. पुरुषासाठी मात्र आयुष्य ‘नॉर्मल’ राहातं.
हा दुहेरी निकष प्रश्नात आणणं गरजेचं आहे. कारण घटस्फोट अपयश नाही तो अनेकदा स्वतःला वाचवण्याचा घेतलेला निर्णय असतो.
स्वतःला सिद्ध करण्या गरज कुणाला आहे?
खरं तर घटस्फोटानंतर स्त्रीने कुणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. पण समाज तिला ती गरज निर्माण करून देतो. आणि तरीही मुलांसाठी, स्वतःसाठी, आयुष्यासाठी प्रत्येक अडथळ्यांवर मात करत ती पुढे जाते.
तिचं अस्तित्व तिच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून नसतं. ते तिच्या निर्णयांवर, ताकदीवर आणि माणूस म्हणून असण्यावर उभं असतं.