राज्यात पहिल्यांदाच महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

Update: 2020-07-04 02:22 GMT

राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि ‘उमेद’ अभियान यांनी पुढाकार घेतला आहे. गावागावातील माळरानावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची प्रगती साधण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. यासाठी राज्यात पहिल्यांदाच महिला शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सुमारे साडेचौदा लाख महिला शेतकरी या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतील. खरीप हंगामातील सेंद्रीय शेती, एकत्रित शेती अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये चर्चा होणार आहे. आज शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून हे प्रशिक्षण सुरु होईल.

प्रशिक्षणात parthlive.com या वेबसाइटवरून तसेच उमेद अभियानाच्या mission umed या युट्यूब चॅनेलवरुन सहभागी होता येईल. या प्रशिक्षणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे मार्गदर्शन करणार आहेत.

महिला शेतकऱ्यांचे काम मर्यादित न राहता त्यांना शेतीतील अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान, शेळीपालन, कुकुटपालन आदी शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रीय शेतीचे महत्व, एकत्रित शेती अशा विविध विषयांची माहिती व्हावी यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शिवाय हे प्रशिक्षण ऑनलाईन असल्याने डिजिटल तंत्राचा वापर कसा करावा याची प्राथमिक माहितीही यानिमित्ताने महिला शेतकऱ्यांना होणार आहे.

Similar News