Home > ‘माझा गोपा आमदार झाला’, गोपीचंद पडळकर यांच्या आईची भावनिक प्रतिक्रीया

‘माझा गोपा आमदार झाला’, गोपीचंद पडळकर यांच्या आईची भावनिक प्रतिक्रीया

‘माझा गोपा आमदार झाला’, गोपीचंद पडळकर यांच्या आईची भावनिक प्रतिक्रीया
X

पडळकर वाडी! जेमतेम सहाशे लोकसंख्येचे गाव. या गावात कुणी साध पंचायत समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न पाहिले तर तो वेड्यात निघेल अशी परीस्थिती. धनगर समाजाची १८१ कुटुंबे असणारे गाव उन्हाळ्यात ओस पडलेले असायचे. मेंढपाळ उन्हाळ्यात मेंढ्या चारण्यासाठी स्थलांतरीत व्हायचे. अशा गावातील गोपीचंद पडळकर या ध्येय वेड्या तरुणाने आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ज्या राजकीय परंपरेत आमदाराचा पोरगाच आमदार होतो खासदारांचा पोरगाच खासदार होतो त्यांच्याच घरात पाळण्यातील युवा नेतृत्व जन्म घेते. राहिलेले मार्केट कमिटीचे चेअरमन होतात. त्यांचेच कारखाने निघतात.

प्रस्थापितांच्या समोर कुणी खोकलं की त्यांना ठोकलं अशा परिस्थितीत गाव गाड्यातील बारा बलुतेदार जातींचे संघटन त्यांनी केले. सरंजामी राजकीय क्षेत्रात गोपीचंद पडळकर या तरुणाने आपली सामाजिक राजकीय कारकीर्द सुरू केली. "माझा जन्म आमदार खासदार होण्यासाठीच झाला आहे' अशा आत्मविश्वासाने हा तरुण कामाला लागला आणि आज विधानपरिषदेचे ते आमदार झाले.

या बाबत त्यांच्या आई हिराबाई पडळकर यांच्याशी बातचीत केली तेव्हा या प्रसंगी त्या अतिशय भावनिक झाल्या आणि म्हणाल्या "माझा गोपा आमदार झाला. दोन पोरं भायर गेली की माझ्या जीवाची धाकधूक असायची. कोण काय करल मारून टाकल आशी भीती वाटायची. मी ठरीवल होतं गोपाला डाक्टर करायचं पण दोन मारकान त्यो हुकला पूना राजकारणात शिकला. हे बघायला त्याचे वडील असायला पाहिजे होते. दुसऱ्याच्या वळचणीला असणाऱ्या समाजातून एक सभापती तर दुसरा आमदार झाला ह्या गुष्टीचा आमा सगळ्यांना आनंद आहे."

गोपीचंद पडळकर यांच्या गावी येण्याची वाट त्य़ांच्या भागातील लोक पाहत आहेत. झरे येथील खंडोबा मंदिरात पूर्ण गावाला वाटण्यासाठी ट्रॉली भरून लाडू बनवले आहेत. परिसरातील लोक या नेत्याचे गुढ्या उभारुन स्वागत करणार आहेत.

उठसूट पुरोगामी पणाचा टेंभा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांनी राजकीय घराणी पोसण्यापलीकडे बहुजनातील अशा तरुणांना राजकीय स्पेस निर्माण करून देण्याऐवजी त्याच्या स्वप्नांचे पंख कापण्याचेच काम केले. त्यांनी जी राजकीय घराणी पोसली त्यांनी या पक्षातून त्या पक्षात जाताना निष्ठा विकल्या तर त्यांना राजकीय करीयर असं गोंडस नाव दिलं जातं. मात्र घराणेशाहीच्या राजकारणात टिकण्यासाठी पडळकर यांच्यासारख्या लोकांनी वेगळा पर्याय निवडला असता त्यांच्यावर प्रतिगामी पणाचा शिक्का मारायालाही हीच मंडळी पुढे असल्याचे दिसते.

राजकीय नेतृत्वापासून पडळकर यांना दूर ठेवण्यासाठी काही नेत्यांनी शेवटच्या रात्रीपर्यंत प्रयत्न केल्याचे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर सांगतात. या सगळ्या राजकीय डावपेचात सरंजामी नेत्यांना चितपट करत गोपीचंद पडळकर आमदार होत आहेत. याविषयी बोलताना त्यांनी मला मिळालेल्या संधीचे सोने करेन अशी प्रतिक्रिया दिली. संघर्षातून आटपाडी तालुक्याच्या मुरमाड खडकात उगवलेल्या या राजकीय नेतृत्वाकडून लोकांना अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते कितपत यशस्वी होतील हे येत्या काळात कळेल.

Updated : 14 May 2020 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top