Home > बिझनेस > CoronaVirus: लॉकडाऊन मध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा का?

CoronaVirus: लॉकडाऊन मध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा का?

CoronaVirus: लॉकडाऊन मध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा का?
X

एका बाजूला शिवारात भाज्यांची पिकं कुजून चालली आहेत तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे मुंबईला होणारा भाजीपाल्यांचा पुरवठा २० टक्क्यांनी कमी झाला आहे.

कोरोनव्हायरसच्या राष्ट्रीय आणि राज्यातल्या उद्रेकानंतर २३ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात टाळेबंदी लागू केली. त्यांनी जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आणि आंतरराज्य दळणवळणाला बंदी घातली. या बंदीमधून अत्यावश्यक सेवा पुरविणा-यांना, राज्यातल्या इतर भागातून शहराकडे फळ आणि भाजीपाला आणणा-या विक्रेत्यांना वगळण्यात आले. असे असूनही, वाशीतील कृषी बाजार उत्पन्न समिती (एपीएमसी) शी संबंधित व्यापारी अडचणींचा सामना करत आहेत. वाशी एपीएमसी मधून मुबईला भाजीपाल्याचा पुरवठा होतो. लॉकडाउननंतर जवळजवळ दोन आठवडे उलटून गेले आहेत. व्यापारी सांगतात की, पूर्वीच्या तुलनेत फक्त १५ ते २० टक्के माल उपलब्ध आहे.Food Market

वाशीच्या एपीएमसी भाजी मंडईचे अध्यक्ष कैलास ताजणे सांगतात की, “कोरोनाव्हायरसच्या संकटापूर्वी बाजारात दररोज सुमारे ६०० ट्रक भाजीपाला विक्रीसाठी यायचा. या शुक्रवारी आम्ही फक्त १०० ट्रक माल उतरवला. अडचण मालाची नाही तर वितरणाची आहे. लोक बाहेर पडायला घाबरत असल्याने प्रत्येकाने आपला व्यवसायाचे प्रमाण कमी केले आहे.”

एपीएमसीतल्या व्यापा-यांना महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाजीपाल्याचा पुरवठा होतो. दररोज, सकाळी लवकर भाजीपाला भरलेला ट्रक बाजारात येतो, तिथे माल खाली उतरवून स्थानिक व्यापा-यांना विकला जातो. त्यानंतर ते व्यापारी दादर, भायखळा किंवा बोरिवली मार्केटमधील ठोक विक्रेत्यांना या मालाचा पुरवठा करतात, तेथून किरकोळ विक्रेते आपल्या ग्राहकांसाठी रोजचा साठा घेतात. शेतकरी ते प्रत्यक्ष ग्राहक या प्रवासात मालाचा कमीतकमी चार किंवा पाच वेळा व्यवहार होतो. प्रत्येक टप्प्यावर किंमत निश्चित केली जाते. ही संपूर्ण साखळी मानवी श्रमांवर अवलंबून आहे. यासाठी वाहतुक सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

टाळेबंदीनंतर २८ मार्चला प्रथमच बाजार उघडला. एपीएमसीचे व्यापारी सांगतात की, मुंबईला भाजीपाला पुरवणे कठीण झाले आहे. जोपर्यंत शिल्लक असलेला माल संपत नाही तोपर्यंत नाशवंत वस्तूंची पुढील पुरवठा करण्याची मागणी करू नोंदवता येत नाही.

Transport Difficulties in Food market Courtesy : Social Media

एपीएमसी येथील भाजीपाला व्यापारी संदीप ढेमरे म्हणतात, “वाहतूक सुरळीत झाली आहे पण लोकांच्या मनात अजून पोलिसांची आणि संसर्गाची भीती कायम आहे, म्हणून ते वाशीकडे येत नाहीत. कामगारही साथीच्या भीतीने त्यांच्या गावाकडे परतले आहेत.ट्रकमधून भाजीपाला कसाबसा उतरुन घेण्याइतकेच कामगार उपलब्ध आहेत. यात भर म्हणून बोरिवली आणि दादरमधील काही बाजारपेठांमध्ये गर्दी होते म्हणून पोलिसांनी जमावाला पांगवले आणि बाजार काही काळासाठी बंद केले. त्यामुळे, छोटे घाऊक विक्रेतेही तितकासा माल उचलत नाहीत.” ढेमरे पुढे सांगतात. “किरकोळ विक्रेत्यांना जवळच्या छोट्या घाऊक विक्रेत्यांकडून त्यांचा पुरवठा घेण्याऐवजी वाशी येथे यावे लागते.” या सर्व गोष्टींमुळे सध्या मुंबईचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ढेमरे पुढे म्हणाले, “मुंबईला माल पुरवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना वाहतुकीवर जादाचा खर्च करावा लागतो, तसेच टंचाईचा सामना करावा लागत आहे,”

माटुंगाच्या सिटी लाईट मार्केटमधील किरकोळ विक्रेता, तानाजी डुंबरे सांगतात की, टॅक्सी व टेम्पो चालक आता वाहने बाहेर काढण्यासाठी व्हायरस आणि पोलिसांच्या त्रासाचे कारण सांगून जादा भाडे मागत आहेत. डुंबरे सांगतात, “पण गिऱ्हाईक हे समजून घेत नाही आणि आम्ही जास्त पैसे घेतोय असा आरोप करतात.” नुकताच त्यांनी एकदा बसने प्रवास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अत्यंत अपमानास्पद अनुभव आला. ते सांगतात, “मी माझ्या भाजीची टोपली घेऊन बसमध्ये शिरलो तेंव्हा बस कंडक्टर आणि ड्रायव्हरने मला बाहेर हाकलले. मी आवश्यक सेवा देण्याचं काम करत आहे असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही.” अखेर निराश होऊन डुंबरे यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “मुंबईकरांच्या लक्षात येत नाही की जरी पुरवठा कमी झाला असला तरी तो कायम आहे.” ते पुढे म्हणाले,”नेतेमंडळी सतत अन्न साठवू नका असं सांगत असूनही लोक बाजारपेठेत गर्दी करून गरजेपेक्षा जास्त खरेदी करतात.” विस्कळीत झालेली वितरणाची साखळी पुन्हा सावरण्याची गरज असल्याच्या मताशी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सहमत आहेत. ते म्हणतात,“जर आपण लोकांना घराबाहेर पडू नका असं सांगत असू तर तर त्यांना त्यांच्या घराच्या दाराजवळ त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी तपशीलवार व्यवस्थापनाची गरज आहे. वितरण व्यवस्था अधिक सुरळीत कशी चालेल यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत.”

कोरोनाव्हायरसच्या साथीची भीती आणि वाहतुकीची अडचण यामुळे राज्यातील काही शेतकरी पुरवठा साखळीतून पूर्णपणे तुटून गेले आहेत. नाशिकच्या वैतरणा शहरातील शेतकरी सुनील खटाळे यांचे म्हणणे आहे की त्यांनी या हंगामात काढलेला भाजीपाला आपापसात वाटून घेतला आहे. ते सांगतात, “जे व्यापारी शहरातल्या व्यापार्-यांशी व्यवहार करतात त्यांच्याशी संपर्क करण्याचे आम्ही टाळतो. आमचा सर्वात जवळचा बाजार बंद आहे, त्यामुळे १०० किमीवर असलेल्या नाशिकच्या मंडईकडे जाण्याचा एकच पर्याय शिल्लक आहे, पण तिथले अनेक व्यापारी मुंबईला जा-ये करतात. ते धोकादायक आहे. जर हा विषाणू ग्रामीण महाराष्ट्रात पसरला तर इथे सुविधा नसल्यामुळे अनागोंदी माजेल. हे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचं आहे पण जर आपण आज टिकलो तर पुढीच्या हंगामात आपले नुकसान भरुन काढू. ”

१५ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाउन सरकार वाढवेल किंवा नाही हे ठाऊक नाही, पण राज्याचे शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागातील बंधने सैल करण्याची गरज आहे. ते म्हणतात, “शहरे ही विषाणू संसर्गाची केंद्रे आहेत, पण हा संसर्ग अद्याप ग्रामीण भागात आत फारसा शिरलेला नाही, पण ह्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं मोडलं आहे.” शेट्टी पुढे म्हणाले की, त्यांना राज्यभरातील शेतक-यांकडून सतत फोन येत आहेत आणि ते वाहतुकीच्या अडचणीची तक्रार करत आहेत. त्यांची पिकं शेतात कुजत आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील एका शेतक-याने आपल्या दोन एकरातील फुलकोबी कुजत असल्याचे कळवले आहे. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन कालावधीच्या सुरुवातीच्या गोंधळामुळेही ब-याच ठिकाणी पीकांच्या कापणीला उशीर झाला, कारण शेतक-यांना मजूर मिळत नव्हते. ते सांगतात की, “यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कारण शेती वेळेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, ढोबळी मिरची तयार झाल्यापासून दोन किंवा तीन दिवसांत कापणी केली गेली नाही, तर ती खराब होऊ लागते. संत्री कापणीच्या सहा तासांत वितरित करणे आवश्यक असतं. विशेषत: नाशवंत वस्तूंची घरपोच डिलिव्हरी, हा सध्याच्या आव्हानांवर मात करण्याचा एक मार्ग आहे.” बोंडे पुढे म्हणाले की, अमरावतीमधील काही खेड्यांमध्ये कोबी मोठ्या प्रमाणात पिकला आहे, परंतु वाहतुकीच्या अडचणीमुळे तो शहरांतल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

कृषिमंत्री भूसे म्हणाले, की आंतरराज्य आणि राज्यातल्या अंतर्गत वाहतुकीच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. ते सांगतात, “उदाहरणार्थ, नासिकचा ड्रायव्हर गुजरातमध्ये द्राक्षे वाहतूक करण्यासाठी परमिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. ड्रायव्हरला आरटीओकडे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो ज्यानंतर त्याला जे परमिट मिळेल ते दाखवून तो राज्याच्या सीमा ओलांडू शकेल. भुसे पुढे म्हणाले, “आम्ही जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांनाही पास दिले आहेत. आपल्या राज्याला पुरेसा भाजीपाला आणि फळांचा साठा आपल्याकडे आहे. पण वितरणाची व्यवस्था विस्कळीत असल्याने विक्रीचे उद्दिष्ट गाठता येत नाही. याबाबत नुकताच मी वाशी एपीएमसीच्या अधिका-यांना भेटलो आणि सुधारणा सुचवणारे निवेदन आणि अहवाल मी मुख्य सचिवांना सादर केला आहे.”

ताजणे सांगतात की भाजीपाल्याची बाहेरच्या राज्यातून होणारी आवक ठप्प झाली आहे. प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात ऑर्डर दिल्यास, बाहेरील वाहतूक करणार्‍यांना मर्यादित मालासाठी फेरी करणे आणि रिकामा ट्रक परत नेणे शक्य नाही.”

आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे पण कोणालाही आंबा उत्पादकांची चिमूटभर काळजी असल्याचं दिसत नाही. एपीएमसी फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे म्हणतात,“पीक तयार आहे, पण कोणीही ते विकत घेत नाही. आंबे पाच हजार रुपये डझन भावाने विकले जायचे. तो दर आता २,००० रुपयांवर आला आहे आणि तरीही आंब्याला अजिबात मागणी नाही. शेतक-यांना वाचवण्यासाठी सरकारला तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल.” पानसरे यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ८० टक्के फळं रेल्वे स्थानकांवर किंवा रस्त्यावर तर २० टक्के मॉल आणि दुकानांत विकली जातात. जर कर्फ्यू सुरूच राहिला तर विक्रीचा पहिला पर्याय उपलब्ध असणार नाही.

भाज्यांची आणि फळांची गोष्ट वेगळी आहे. फळे ही चैनीची वस्तू आहे. ज्यांना परवडत नाही ते ती घेत नाहीत. कोरोनाव्हायरसच्या साथीचे रोजगारावर आणि लोकांच्या खरेदी करण्याच्या ताकदीवर एक काळे सावट पसरले आहे. अशा काळात फारच कमी लोक फळांवर खर्च करीत आहेत. पानसरे म्हणतात, “फक्त आंबा नव्हे तर सर्व फळांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. “कोरोना साथीच्या संकटापूर्वी फळांचे ३०० ट्रक बाजारात येत असत. आज ते प्रमाण १०० पर्यंत खाली घसरले आहे आणि त्यातलेही बरेच अद्याप विकले गेलेले नाहीत.”

आंब्याबरोबर द्राक्ष आणि टरबूजांच्या प्रश्नांशी सामना करण्याची गरज आहे, याच्याशी भुसे सहमत आहेत. ते सांगतात, “आम्ही त्या दिशेने काही पावले उचलली आहेत. “फळांमुळे प्रतिकारशक्ती सुधारते म्हणून सर्वांनी फळं विकत घ्यावी असं आवाहन मी केले आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनीही सवड काढून फळं खरेदी करावी. या कठीण काळातही आपण शेतक-यांच्या पाठीशी उभे आहोत हे यातून दिसेल.”

शेतकरी उध्वस्त झाल्याने करोना साथीची भीती ओसरल्यावरही बराच काळ मागणी इतका पुरवठा करता येणार नाही, अशी भीती शेट्टी यांना आहे. ते म्हणतात, “शेतकरी पूर्वीइतका पुरवठा करण्याला राजी नसेल यामुळे शहरांमध्ये टंचाई निर्माण होईल आणि किंमती वाढतील.” या संकटातून सावरणे सोपे नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

सदर लेख परी https://ruralindiaonline.org या वेबसाईटला १ फेब्रुवारी ला प्रसिद्ध झाला असून हा लेख पत्रकार पार्थ एम. एन. यांचा आहे. या मुळ लेखाची लिंक खाली पोस्ट केली आहे.

https://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/why-theres-less-food-on-the-table/amp_articleshow/74988450.cms

अनुवाद: रविंद्र झेंडे, पत्रकार, लेखक आणि अभ्यासक.

Updated : 11 April 2020 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top