Home > Max Woman Blog > आकड्यांचा खेळ आणि गोंधळवणारे शब्द.. काकूंचा खरंच आकड्यांचा गोंधळ झाला का?

आकड्यांचा खेळ आणि गोंधळवणारे शब्द.. काकूंचा खरंच आकड्यांचा गोंधळ झाला का?

आकड्यांचा खेळ आणि गोंधळवणारे शब्द..  काकूंचा खरंच आकड्यांचा गोंधळ झाला का?
X

कामवाल्या मावशी आणि अठराशे रुपयांचा वाद याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यातील मावशींना पैसे मोजता येत नाही. असे मला वाटत नाही. मला वाटतेय की, त्यांनी कामाचे पैसे ठरवले असतील. तेव्हा अठराशे रुपये द्यायचे असे बोलणे झाले असेल, ते मावशींनी मान्य केले असेल, पण अठराशे या शब्दाने ध्वनित होणारी रक्कम त्यांच्या मते वेगळी असावी.

लहान मुलांचे असे दीड व अडीच या शब्दांबद्दल घडते. दीड म्हणजे एक आणि अर्धा की अडीच म्हणजे एक आणि अर्धा? याचा त्यांना थांबून विचार करावा लागतो. बऱ्याच मराठी माणसांचे मोठे झाल्यावर देखील हिंदी बोलताना देढ आणि ढाई बद्दल असे घडते.

दीड, अडीच, सव्वा हे समजा arbitrary संबोध आहेत (म्हणजे ही नावे वापरण्यामागे काही नियम नाहीत.)अठराशे हे संख्येचे नाव तर अगदी नियमाला धरून असलेले आहे. असे आपल्याला वाटू शकते, मग त्यात कसला गोंधळ? पण आपल्या भाषेतले काही अंगभूत घोळ अनेकदा आपल्या नजरेत येत नाहीत. जसे मराठीत वीस पासून पुढील आकड्यांची नावे घेताना आधी उजवीकडच्या आकड्याचा संबोध दिला जातो. नंतर डावीकडच्या आकड्याचा संबोध दिला जातो. पण हेच जेव्हा आपण एकवीसशे म्हणतो, तेव्हा आधी डावीकडच्या आकड्याबद्दल बोलतो व नंतर उजवीकडच्या आकड्याबद्दल बोलतो. असे अनेक गुंते असतात, शैक्षणिक अनुभवांचे खूप exposure नसेल, तर हा गुंता सोडवणे सोपे जात नाही. अनेकदा जमतही नाही. त्यामुळे हिशोब समजतो पण आकड्यांच्या नावात गोंधळ होऊ शकतो.

पैशाचे हिशोब करताना माणसे खूप दक्ष असतात. त्यांना तो हिशोब समजत नाही. असे बहुदा होत नाही... काजूच्या दिवसात ओले काजूगर विकायला आलेल्या कातकरी बाया एकेका वेळी दोन-तीन हजाराचे काजू विकतात पण त्यांचे सगळे हिशोब त्या वीसच्या पटीत करतात. त्यांनी पद्धत शोधलीय व त्या समर्थपणे तो व्यवहार सांभाळतात. त्यामुळे या मावशींना हिशोब येत असणार, त्यांच्या कामाची किंमत त्यांनी ठरवली असणार, पण त्यांच्या मनात जी रक्कम आहे. त्या रक्कमेचं नक्की नाव त्यांना माहीत नाहीये.

माझ्या नवऱ्याने अनिशने सांगितले की, कोकणात सावकारी करणारे लोक आदिवासींकडून जास्तीचे व्याज उकळण्यासाठी काळाचे मोजमाप करताना म्हणायचे 'फेब्रुवारी गेला मग होळी गेली. मग फाल्गुन गेला. मग शिमगा गेला..' असे त्याच काळाचे वेगवेगळे नाव उच्चारून ते आदिवासी कर्जदाराला गोंधळात टाकायचे. ते बघून माझ्या मनात आले की, कदाचित आदिवासी लोकांची काळाचे वर्णन करण्यासाठी व काळाचा संदर्भ देण्यासाठी शब्दांचा वापर करण्याची पद्धत वेगळी असेल.. ( जसे ग्रामीण भागात मुलांचे जन्मदिवस अधोरेखित करताना दिलेले संदर्भ हे .. तू जन्मलीस त्या वर्षाला बागेतून वणवा गेलेला.. असे असतात, म्हणजे काळाचे वर्णन तारीख, महिना अशा एका नेमक्या नावाने केले जात नाही ) त्यामुळे काळाचे असो, पैशाचे असो, वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द बदलला, की, परिस्थितीचे आकलन होण्यात अडथळा येतो.

या व्हिडीओच्या अनुषंगाने ज्याबद्दल बोलावेसे वाटते, तो दुसरा मुद्दा म्हणजे prank किंवा मस्करीचा आनंद घेणे हे cool असण्याचे लक्षण ठरलेले आहे आणि नव्या सांस्कृतिक अवकाशाशी जुळवून घेताना संवेदना मागे टाकून आपण त्यात सामील व्हायला शिकत आहोत.

मुक्ता दाभोळकर

Updated : 1 Sep 2020 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top