Home > Max Woman Blog > उद्धव ठाकरे तुम्हालाही ‘आपला माणूस’ वाटतात का?

उद्धव ठाकरे तुम्हालाही ‘आपला माणूस’ वाटतात का?

उद्धव ठाकरे तुम्हालाही ‘आपला माणूस’ वाटतात का?
X

"उद्धव ठाकरे टिव्हीवर येऊन बोलतात, तेव्हा कुटुंबातलं कोणीतरी आपल्यासोबत हितगूज करतंय असं वाटतं." अशा भावना मीनलने आज त्यांना ऐकता ऐकता व्यक्त केल्या. खरं म्हणजे सेनेच्या राजकीय भूमिकेविषयी माझी विशिष्ट मतं आहेत ती आहेत. मात्र बायकोचा हा उत्स्फूर्त अभिप्राय असाच आलेला नाही.

मुळात उद्धव यांना मुख्यमंत्रीच व्हायची इच्छा नव्हती, असेच चित्र होते. एका राजकीय अपरिहार्यतेचे राजकीय आपत्य आहे त्यांचे मुख्यमंत्री होणे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हे झेपणारच नाही, असं म्हणत अनेकजण टीका करत होते. त्यांना प्रशासनातला अनुभव नव्हता, हा आक्षेपाचा मुख्य मुद्दा होता. मात्र सध्या राज्याला जे सरकार मिळालंय ते चालवायला जी लवचिकता, उदारता लागते ती उद्धव यांच्याकडे दिसतेय. कोणत्याही प्रकारचे मतभेद अजून तरी कोणीही चव्हाट्यावर येऊ दिलेले नाहीत.

संकटकाळात नेतृत्वाची खरी कसोटी लागते. आणि त्यात संकट जर का करोनासारखे अत्यंत गंभीर असते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हवालदिल झालेले जगाने बघितले आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव मात्र परिस्थिती व्यवस्थित हाताळताना दिसले आहेत. टिव्हीवर येऊन उद्धव आपल्या विशेष शैलीत हितगूज करतात. (ते जनतेशी संवाद साधत नाहीत किंवा संबोधित करत नाहीत, उपदेश, आदेश तर अजिबात देत नाहीत!) त्यांच्या शांत, संयत स्वरात लोकांची काळजी डोकावत असते. एक आर्जव असते त्यांच्या बोलण्यात. कोणीतरी काहीतरी खुस्पट काढतो तेव्हा आवश्यक तेथे त्यांचा स्वर दृढनिश्चयी आणि आग्रही होत जातो. संकट गंभीर आहे, हे ओळखून कायदा हत्यारासारखा उगारत नाहीत ते. मध्येच काहीतरी आठवल्यावर 'तुम्ही हात धुताय ना?' असं ते आस्थेवाईकपणाने विचारतात. मास्क-रूमाल वापरा, बाहेर पडू नका, असे केवढ्या आपुलकीने सांगत असतात. सारे आश्वासक वाटते. संकट लगेच जाणार नसते, मात्र कुटुंबप्रमुखाचे शब्द मोठा आधार देत असतात.

हे ही वाचा | CoronaVirusUpdate: आज राज्यात १६२ रुग्ण, मृतांचा आकडा ७२ वर

सहकारी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, अधिकारी, डॉक्टर, नर्स, पोलिस यांच्या कामाचा आदरपूर्वक उल्लेख येतो त्यांच्या बोलण्यात. शेतमाल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचे कृतज्ञतेने आभार मानतात. कोणाला बाळबोध वाटतील असे बारीकसारीक तपशील देत, जाणीवपूर्वक उल्लेख ते करत जातात. लॉक डाउनला धरुन काही वेळेस त्यांनी काही निर्णय घेतले, काहीशी ढील दिली. त्यावर आक्षेप घेतले गेले. मात्र यातून त्यांच्यातलं संवेदनशील मन दिसत राहिलं. लोकांना फार त्रास होवू नये, म्हणून असं करत होते, असं वाटत आलं. मात्र तेथे कठोर होण्याची गरज अधोरेखित होत होती. त्यात आपला समाज. समाजमाध्यमात सक्रिय नागरिक फेसबुक, व्हॉट्पऍवर 'मीच माझा रक्षक' असा डीपी ठेवतात आणि भाजी घ्यायला बाजारात जत्रा भरवतात, तेव्हा करोना फैलावण्याचं आव्हान कैक पटींनी वाढलेले असते...

करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई करोनाचे हॉटस्पॉट बनू पाहातेय. आटोक्यात आणायला शर्थ करायला लागेल. टेस्टिंग किट्स वाढवायला पाहिजेत. डॉक्टर पीपीई मागतातय. लॉकडाउनची कसून अंमलबजावणी करुन लवकरात लवकर राज्य यातून बाहेर कसे येईल, असे बघायला लागेल. जर्मनीकडून शिकायला हवं. अपेक्षा तर आहेतच जनतेच्या. भिलवाडा पैटर्न समजून घ्यायला हवा. त्यानुसार काही पावलं उचलायची गरज असल्यास तातडीने केले पाहिजे.

हे ही वाचा | Coronavirus : कल्याण-डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा?

एका मोठ्या आजारातून ते स्वतः गेलेले, सावरलेले आहेत. करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत कधी कधी त्यांच्या चेहऱ्यावर किंचित ताण दिसतो. मात्र तो ते लपवतात खुबीने. त्यांच्या काही लकबी, शब्द कोटया, ठेवणीतली विशेषणं ऐकायला छान वाटतात. मातोश्रीच्या अंगणातल्या चहावाल्याला करोनाची बाधा झालीय. त्यात मुख्यमंत्र्यांच्या घरातला बराच स्टाफ तिकडे चहाला जात असणार कदाचित! माणूस म्हणून मनात येणाऱ्या साऱ्या शंका तळाशी ठेवून चर्येवर ते आनंदी वृत्ती ठेवत बोलताय.

बायको कोणाही नेत्याविषयी सावध बोलत असते. 'हे सारे राजकारणी एकजात सारखे असतात,' असं तिचं लाडकं मत आहे. मात्र उद्धव यांच्याविषयी तिचे उदगार ऐकून तिच्याशी सहमती दर्शवताना हेच लिहितोय.

उद्धव एक राजकीय नेता, मुख्यमंत्री, पक्षप्रमुख कमी आणि महाराष्ट्र नावाच्या कुटुंबाचा प्रमुख जास्त वाटू लागतात, हेच त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. संयमी आणि धीरोदत्त वृत्तीच्या या माणसानं अजून तरी अनेकांची मनं जिंकली आहेत. अगदी सेनेचे टोकाचे टीकाकारही यात आहेत. प्रश्न विचारायचे तिथे नक्की विचारू. सध्याच्या अत्यंत कठीण काळात ते करत असलेल्या प्रयत्नांना अभिनिवेश बाजूला ठेवून दाद द्यायला हवी, असे मनापासून वाटले.

हे ही वाचा | 14 लाख करदात्यांना फायदा, परताव्याची रक्कम 18000 कोटी

पुढं जाऊन त्यांना आणखी काही कठोर परीक्षा द्यायच्या आहेत. करोनानंतरच्या काळात राज्यशकट हाकताना त्यांचे नेतृत्व आणखी कसाला लागणार आहे, हे निश्चित. मात्र सर्वांना सोबत घेऊन, सध्याची स्थिती हाताळणारे मिस्टर कूल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनाला भावतात, इतकीच नोंद घेण्याच्या उद्देशाने हा लेखन प्रपंच आहे.

(तळ टिप : एखाद्या राजकीय नेत्याचं भाषण ऐकताना त्याचा फोटो म्हणून स्क्रीनशॉट पहिल्यांदाच घेतलाय.)

Updated : 9 April 2020 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top