Home > रिपोर्ट > 'या' औषधामुळे झाले कोरोनाचे रुग्ण बरे?

'या' औषधामुळे झाले कोरोनाचे रुग्ण बरे?

या औषधामुळे झाले कोरोनाचे रुग्ण बरे?
X

क्लोरोक्विन हे औषध शरीराबाहेर, परीक्षानळीत , अनेक व्हायरसेसविरुद्ध गुणकारी असल्याचे आढळले आहे: उदा. रेबीज, पोलियो, एड्स , इबोला इत्यादी. क्लोरोक्विन हे करोना व्हायरसविरुद्ध कसे काम करते हे पाहूया:

१. मानवी पेशीत शिरण्यासाठी व्हायरसला , आधी मानवी पेशींच्या पृष्ठभागावरील रिसेप्टर बरोबर बांधून घेणे आवश्यक असते. रिसेप्टरचे भाषांतर "पूरक खोबण किंवा जागा" असे करता येईल. सियालिक ऍसिड नावाची साखरेसारखी संयुगे या रिसेप्टच्या प्रथिनांच्या शेवटाला असतात आणि व्हायरस त्यांना ओळखून त्यांच्याशी संलग्न होतो. या सियालिक ऍसिडच्या निर्मितीच्या कामात quinone reductase 2 नावाच्या एन्झाइमचे कार्य बंद पाडून क्लोरोक्वीन व्यत्यय आणते , आणि त्यामुळे व्हायरसला मानवी रिसेप्टर सापडणे अवघड बनते.

२. जो व्हायरस रिसेप्टरला बांधला जातो, त्याभोवतालचे मानवी पेशींचे मेम्ब्रेन मग त्याला वेढून एक एन्डोसोम नावाची पिशवी किंवा बुडबुडा तयार करते जी पेशींच्या आत खेचून घेतली जाते. पेशींच्या अंतर्भागात या पिशवीत मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन आयन सोडले जाऊन त्या पिशवीच्या आतले द्रावण ऍसिडिक बनते. या ऍसिडीकरणामुळे व्हायरस आणि एन्डोसोमचे आवरण हे एकत्र होतात आणि त्यामुळे व्हायरसच्या आरएनएची त्या एन्डोसोमच्या पोकळीतून सुटका होऊन ते पेशीच्या सायटोप्लाझ्ममध्ये प्रवेश करते. आता क्लोरोक्विन हे अल्कलाईन असल्यामुळे, ते, या ऍसिडिफिकेशनच्या प्रक्रियेतले हैड्रोजन आयन स्वतःकडे खेचून घेते आणि हे व्हायरसचे आरएनए मानवी पेशींच्या सायटोप्लाझ्ममध्ये घुसण्याची प्रक्रिया बंद पाडते.

३. व्हायरस आपल्या पुनरुत्पादनाच्या शेवटी शेकडो नवे व्हायरस तयार करतो. यातली शेवटची स्टेप म्हणजेही व्हायरसच्या प्रथिनांना साखरेच्या अणूंचे जोडले जाणे असते, ज्याला ऍसिड स्थितीची जरुरी असते. ही ऍसिड स्थिती निर्माण होण्यातही क्लोरोक्वीन व्यत्यय आणते, ज्यामुळे व्हायरसच्या फायनल आवृत्तीमध्ये दोष निर्माण होऊन ते नवजात व्हायरस, मानवी पेशींना इन्फेक्ट करण्यास कमकुवत बनतात.

अशा प्रकारे क्लोरोक्विन हे औषध, व्हायरसच्या अनेक जीवन-प्रक्रियांमध्ये व्यत्यय निर्माण करून मानवाला वाचविते .

हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन हा क्लोरोक्विनचाच एक भाऊ असून त्याचे बरेचसे गुणधर्म क्लोरोक्वीन सारखेच आहेत. त्याची मानवाला असलेली 'टॉक्सिसिटी", क्लोरोक्वीनपेक्षा काहीशी कमी आहे असे काहींचे म्हणणे आहे. दोन्ही औषधे तोंडावाटे गोळ्यांच्या स्वरूपात दिली जातात , जिथून ती रक्तात उत्तम प्रकारे उतरतात. इतकेच नाही, तर रक्तातून ती , रोगाशी संबंधित इंद्रियांमध्ये- म्हणजे फुफ्फुसे, लिव्हर, किडनी आणि स्प्लीनमध्ये शिरून , रक्ताच्या लेव्हलच्या २०० ते ७०० पट अधिक लेव्हल निर्माण करतात.

करोना व्हायरस सायटोकाइन्सचे जे वादळ निर्माण करून मानवी मृत्यूला कारणीभूत होतो, त्या प्रक्रियेमध्येही हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन गुणकारक ठरू शकते.

करोनामध्ये क्लोरोक्विनचा यशस्वी वापर केलेल्या साऊथ कोरियन डॉक्टरांच्या मते हे औषध वयस्क आणि आधीच आजारी असलेल्या रोग्यांसाठी राखून ठेवले जावे- तरुणांना त्यानंतर.

क्लोरोक्विन ५०० मिलिग्रॅम दिवसातून दोनदा दिले जावे.. क्लोरोक्विन उपलब्ध नसल्यास हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन ४०० मिलिग्रॅम दिवसातून एकदा घ्यावे असेही ते सांगतात.

ट्रम्प यांनी करोनासाठी क्लोरोक्विनचा पुरस्कार केल्यावर कॅडिला , इप्का , टॉरेन्ट , सिप्ला आणि आरती , या काही भारतीय कंपन्यांचे शेअर्स चढले आहेत. मात्र या कंपन्या , या गोळ्या बाजारात पुरेशी प्रमाणात कधी आणू शकतील याबाबत जरा संभ्रम दिसतो.

-मिलिंद पदकी

(करोना वर अधिकृत उपाय सापडलेला नाही. या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाने अभ्यासांती मांडलेली आहेत. वैद्यकीय उपाययोजनांवरील चर्चेसाठी हा लेख प्रकाशित करण्यात आलेला आहे)

Updated : 23 March 2020 9:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top