तिला मिळालं हक्काचं घर... म्हाडाची सोडत जाहीर
X
आजच्या वाढत्या महागाईत सामान्यांना स्वतःच्या हक्काची घरं घेणं शक्य होत नाही. मात्र म्हाडा सामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करत आहे. तेही स्वस्त किंमतीत... याच म्हाडा म्हणजेच मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची 217 घरांसाठीची सोडत जाहीर झाली. यात सोडतीच्या पहिल्या मानकरी राशी कांबळे ठरल्या आहेत. तर दीनानाथ नवगिरे हे दुसरे मानकरी ठरले आहेत. म्हाडाच्या वेबसाइटबरोबरच फेसबुकवरही या सोडतीचे निकाल पाहता येणार आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २१७ घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीस नेहमीप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद लाभला. या घरांसाठी ६६,०९१ जणांनी अर्ज दाखल केले होते. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकारनगर, चेंबूर येथील १७० व मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ घरांचा समावेश होता. यांसाठी अल्प उत्पन्न गटासाठी ५३,४५५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२,६३६ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान या सोडतीला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित होते.
सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षायादीवरील अर्जदारांची नावे https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जातील.