Home > Max Woman Blog > हिमोग्लोबीन चंगा, तो सबकुछ चंगा !

हिमोग्लोबीन चंगा, तो सबकुछ चंगा !

हिमोग्लोबीन चंगा, तो सबकुछ चंगा !
X

दीड एक वर्षांपूर्वी. स्ट्रेस लेव्हल खूप वाढली, झोपेची काशी झाली, जेवणावर परिणाम झाला. डोळ्याखालची काळी वर्तूळ अधिक गडद झाली. कळतं होत काहीतरी बिनसतंय, पण नेमकं काय. रक्त चेक केलं. हिमोग्लोबिन सात साडे सात आठ..अलार्म वाजला... काही डॉक्टर मित्रांच्या सणसणीतशिव्या खाल्ल्या.

मरायचंय का..डॉ. पिंगळे एकदा म्हणाले की तू जितकं काम करतेस त्यावरून तुझं एचबी फार कमी आहे. असं वाटतं नाही. हे विलपॉवरवर फार ओढता येणार नाही. शरीर आहे ते थकतंच. थांबून उपचार करायला हवे.

तेव्हाही वेळ नाही म्हणत चालढकल सुरु होती. घऱी आणलेले चणे, मनुका कितीतरी दिवस पडून राहायचे, बीट तर आवडायचंच नाय आपल्याला. कॅन्सरच्या थेअरी ऐकून रेड मिटही काही दिवस बंद केलं होतं. अंजिरचा चरचरीतपणा नको वाटायचा. गुळ उष्ण वाटायचा. किती नाटकं तुझी म्हणत घरी खूप तडी पडायची.

तर.. एक दिवस ऑफिसमधून घरी जायला निघाले. खुर्चीत सहज लक्ष गेलं. लांबसडक केसांचा सडा पडला होता. धोधा केस गळत होते. प्रसूतीपूर्वी, नंतरही हा अनुभव नव्हता. कधीही केसांची तक्रार नव्हती. उलट लांबसडक, दाट केस हा युएसपी.

त्या आठवड्यातही कंगव्यात केसांची ही गुंतवळ. घऱात जिथे तिथे केस. एरवी कोणताही शॅम्पू लावला, तेल लावला नाही लावला. असा कॅज्युअल कारभार असतानाही केसांनी कधी असहकार पुकारला नाही.. दाट केसांची सुतळ झाली होती. एकदा दुपारी म्हटलं बसं झालं.

पंधऱा मिनिटांत आले सांगून मी अनेक वर्षांनी केसांना कात्री लावली. पार्लरवालीने दोन वेळा आर यू शुअर विचारलं ? अनेकांना आशर्चय वाटलं. तो लुकही मी एन्जॉय केला. तरीही केसांची सवय होती. सवयीने अंबाडा बांधायला हात मागे जायचा. गोव्याला गेले की फुलं माळता न येण्याची रुखरुख लागून राहायची.

मग ठरवून आहारात हिमोग्लोबीन सुरु केलं. मनुका, बीट, आठवड्यातून एकदा भोपळ्याची न आवडणारी भाजी. शेंगदाणे चणे गुळ,खजूर... दोन महिन्यांनी केसगळती कमी झाली. वजनाबिजनाचं टेन्शन मी कधी घेत नाही, आयुष्य एक्स -एक्सएलच्या पार असतं अन् खाण्या खिलवण्यावर अफाट प्रेम असल्याने वजनाच्या काट्याची चिंता न करता व्यवस्थित खाल्लं..(व्यायाम करायची अन् ठराविक वेळेलाच जेवण्याची शिस्त माझ्याकडे नाही हेही तितकंच खऱं) तरीही हिमोग्लोबिनसाठी हे प्रयत्न ठरवून केले.

चहाही सोडायला सांगितला होता, तो जमला नाही. परवा आंबाडा घालण्यासाठी केस सोडले तेव्हा लेकाने हा फोटो क्लिक केला, समोर भिंतीवर जुना फोटो होता, हे आई आता बघ तु मोठ्ठा गजरा घाल गोव्याला गेल्यावर..अरे हो माझ्या लक्षात आलं.

काल काही कारणासाठी हिमोग्लोबिन चेक केलं ते थोडं वधारलंय. मागील काही महिन्यांत केलेल्या चाचण्यांमध्ये लक्षात येतं आहार वरखाली झाला की एचबी हलेडुले करतं. त्यामुळे ते नीट लेव्हलला राहण्यासाठी थोड डोळसं खायला हवं.

हेल्थरिपोर्टिगमुळे मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे एचबीच्या बद्दल, मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाबद्दल तसेच योग्य वेळी करायच्या निदान चाचण्याबद्दल हलगर्जीपणा करायला नको. चाचण्यांमध्ये काहीच आलं नाही म्हणत पैसे वाया गेलेले व नाराज झालेल्यांना हा आरोग्याचा बोनस असतो. हे काहीवेळा लक्षात येत नाही.

ताजे गरम आणि पोषक खाल्लं की आजार दूर राहतात, तब्येत व्यवस्थित राहते हे माझ्या सासूबाई कायम सांगतात. मी ते अनेकदा ऐकण्याचा प्रयत्न करते. एचबी लो असताना स्वतःलाही लो वाटतं. चक्कर येते, कुठेही पडू वा इतर अनेक त्रास होत राहतात. ते वेळीच लक्षात घ्यायला हवे.

कोरभर चहा घेऊन थेट दुपारी जेवणाऱ्या अनेकजणींना पाहून वाईट वाटतं. फळ महाग झाली तरीही टोमॅटो, बीट, गाजर चण्यादाण्यासारखे गुळासारखे हातातले उपाय आहेत , ते जरुर चाखायला हवेत.

मुलांचं आधी पाहायला हवं हे कबुल, पण मुलांना वाढवण्यासाठी आपलंही शरीर भक्कम हवं. माझ्या अनेक मैत्रीणी नेमाने डायट करणाऱ्या, जिम करणाऱ्या, वेळेवर जेवणाऱ्या आहेत. त्यांना आपला कडक सलाम. पण माझ्यासारख्या चुकार पोरीनेही हिमोग्लोबीनसाठी इतकुसं का होईना केलंय. त्याचे रिझल्ट शेअर करतेय..

- शर्मिला कलगुटकर

Updated : 11 Feb 2020 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top