Home > Max Woman Blog > "डॅशिंग" मंदा म्हात्रे...!

"डॅशिंग" मंदा म्हात्रे...!

डॅशिंग मंदा म्हात्रे...!
X

एकाबाजूला गर्भश्रीमंत उच्चभ्रू लोकवस्ती असलेला भाग तर दुसऱ्या बाजूला अत्यल्प गटातील तुर्भे इथली झोपडपट्टी अशा दोन्ही स्तरावर विभागलेल्या बेलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार मंदा म्हात्रे दोन टर्म करत आहेत. मंदाताईंच्या रूपाने एक बुलंद नेतृत्व या मतदारसंघाला मिळाले आहे.

२०१४ ला केलेली कामे, जनतेच्या मनात तयार झालेली प्रतिमा याचा त्यांना या निवडणुकीत खुप फायदा झाला.नवी मुंबईच्या राजकारणात यावेळी मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाची झोप उडवणारी घटना याठिकाणी घडल्याने या मतदारसंघाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आयाराम गयारामांच्या राजकारणाचा फटका बसणारअशी शक्यता दिसू लागताच मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

यामुळेच ही निवडणूक मंदा म्हात्रे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली. नाईक कुटूंब आणि म्हात्रे कुटूंब यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीतून भाजप प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला मंदाताईंनी कडाडून विरोध केला. गणेश नाईक आपले साम्राज्य वाचविण्यासाठी भाजपमध्ये येत आहे असे त्यांचे म्हणणे होते. २०१४ ला मोदी लाटेत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या मंदाताईंनी तेव्हा राष्ट्रवादीकडून उभारलेल्या गणेश नाईक यांचा केवळ १५०० मतांनी पराजय केला होता. त्यांच्या भाजपात येण्यामुळे आपले तिकिट तर कापले जाणार नाही ना अशी भिती मंदा म्हात्रे यांना वाटू लागली होती. मात्र शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या यादीत बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देणार असल्याचे घोषित करण्यात आले. पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आली.

नवी मुंबईतील एकतरी मतदारसंघ आमच्यासाठी सोडण्यात यावा अशी मागणी इथले शिवसेना पदाधिकारी सातत्याने करत होती. तशी तयारीसुध्दा झोपडपट्टी पुर्नवसन मंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा करत होते. एकाबाजूला शिवसेनेची मागणी तर दुसऱ्या बाजूला गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश अशा दोन्ही बाजूंनी मंदा म्हात्रे संकटात सापडल्या होत्या. असे असताना देखील पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत बेलापूर मतदारसंघासाठी त्यांचीच निवड केली.

अतिशय गरीब कुटूंबातून आलेल्या मंदाताईंनी १९९४ पासून आपल्या सामाजिक आणि राजकीय कारर्किदीस सुरूवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर नवीमुंबईमधून मंदा म्हात्रे यांच्यारूपाने त्यांना खंबीर नेतृत्व करणारी महिला प्रतिनिधी मिळाली. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना महिलांचे विभागवार मेळावे घेऊन पक्ष विस्ताराचे मोठे काम त्यांनी केले होते. प्रकल्पग्रस्तांसाठी विविध आंदोलने,मत्सव्यवसायिकांसाठी आंदोलने करून आपल्या मतदारसंघातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आधी नगरसेवक नंतर सभापती असा सुरू झालेला प्रवास २००४ ला विधान परिषेदेच्या सदस्य निवडीपर्यत झाला.

नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या एकहाती सत्तेला कंटाळून अखेर मंदाताईंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. २०१४ ला झालेल्या अटीतटीच्या लढतीत जिंकून त्या जायंट किलर ठरल्या होत्या. गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर लोकांनी विश्वास दाखवला आणि तब्बल ४३ हजार ५९७ मतांनी त्या निवडून आल्या. दुर्दम्य इच्छाशक्तीचे चालते बोलते उदाहरण म्हणजे आमदार मंदा म्हात्रे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

https://youtu.be/24roBU9EukQ

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/3012397832137758/

-वर्षा कुलकर्णी

Updated : 20 Jan 2020 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top