बाबांनी माझी स्वप्न पूर्ण केली त्यांचं एक स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद..
X
दहावीत होते मी पण परीक्षा होती बाबांची..मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातली. आई वडील दोघेही जेमतेम शिकलेले. कुटुंब तस मोठं होत.पण संपूर्ण परिवारात अजूनही कुणी दहावी पास नव्हतं. बाबांना स्वतःला शिकायची फार इच्छा होती. रात्र शाळेत थोडेफार शिकले ते. पण परिस्थिती मुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. म्हणून मी खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. ट्युशन वगैरे त्यावेळी झेपणार नव्हतं. म्हणून तेच अभ्यास घ्यायचे.
शिक्षण न घेतल्याने आयुष्यात किती तडजोड करावी लागते आणि शिक्षणानेच परिस्थिती कशी बदलू शकते याचे धडे लहानापासून त्यांनीच दिले. शिक्षणाबरोबरच खेळ आणि कलेलाही त्यांनी तेव्हढच प्रोत्साहन दिलं.दहावीत मी होते पण परीक्षा त्यांची होती.माझं दहावी पास होणं हे माझ्यापेक्षा जास्त त्यांच स्वप्न होत.
दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.. बाबांच्या आणि माझ्या दोघांच्याही स्वप्नांची पहिली पायरी मी पार केली. आमच्या संपूर्ण परिवारात दहावी पास झालेली पहिली त्यांची मुलगी होती, हा अभिमान आणि आनंद त्यांच्या डोळ्यात पाहून.. आजवर ज्याने आपली सर्व स्वप्न पूर्ण केली त्यांच एक स्वप्न पूर्ण केल्याच समाधान मला त्यावेळी मिळालं..
मार्क्स किती मिळाले यापेक्षा आपण यशाची एक पायरी पार केली हे आजच्या पिढीला समजायला हवं.. कारण गुणांवर फक्त पगार मोजला जातो..आयुष्याचा आनंद नाही..
मनिषा मोरे, अभिनेत्री