Home > Max Woman Blog > तर #CouplesChallenge पडू शकतो भारी...

तर #CouplesChallenge पडू शकतो भारी...

तर #CouplesChallenge पडू शकतो भारी...
X

सध्या सोशल मीडियावर कपल चॅलेंज असा एक ट्रेंड भरपूर लोकप्रिय होतोय. यात अगदी चढाओढ असल्यासारखी लोक आपले ‘एक दुजे के लिये’ स्टाईल फोटो टाकत आहेत. पण त्याचबरोबर एक नवरा दोन बायका, राजकारण्यांच्या जोड्या, प्रियकर प्रेयसी, लिव्ह इन वाले, गे, लेस्बियन्स जोड्या ते अगदी पोलिटिकल मित्र शत्रू पक्ष जोड्या, अगदी कुत्र्या मांजरांचेच नव्हे तर निर्जीव बाईक गाड्यांच्या जोड्यांचे देखील फोटो टाकण्याचा सपाटा उत्साही लोकांनी चालवला आहे. त्यातून भरपूर मनोरंजनही होत आहे.

खरंतर सोशल मीडियावर असे हजारो ट्रेंड्स मास सायकॉलॉजी म्हणजेच सोशल मीडियावरील युजर्सचा मानसिक कल अभ्यासण्यासाठी आणले जात असतात. अर्थात या ट्रेंड्सचे गिनीपिग (guinea pig) व्हायचे की नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अश्या कुठल्याही ट्रेंड्स मध्ये हिरीरीने भाग घेण्यापूर्वी थोडा विचार जरूर करावा.

असे ट्रेंड्स फॉलो करताना आपण आपला इत्यंभूत डेटा केवळ फेसबुक इन्स्टाग्रामलाच देत नसून जागतिक PR कंपन्या, मोबाईल इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्या कंपन्या यांनाही नकळत पुरवत असतो.

सोशल मीडियावर लोक सर्वात अधिक कशाला पसंती देतात? त्यांच्या मनाचा कल काय आहे? कुठल्या प्रकारच्या ट्रेंड्स ना कुठल्या देशात, प्रदेशात, कशा प्रकारचा (कमी किंवा अधिक) रिस्पॉन्स मिळतो? याचा डाटा एकत्र करून फेसबुक त्याचा व्यावसायिक उपयोग करीत आहे असे अनेक आरोप या पूर्वीच फेसबुकवर सिद्ध झाले आहेत.

अमेरिकन जनतेच्या मास सायकोलोजीला पूरक असे तंत्र वापरून ट्रम्प सारखा वाह्यात माणूस त्यांच्या बोकांडीवर बसला. आपल्या देशातील नेतृत्वाचे आणि फेसबुकचे साटेलोटे 2014 च्या निवडणुकीत उघडकीस आलेच आहे.

त्यामुळे निव्वळ fun element म्हणून अश्या बालिश ट्रेंडसना बळी पडण्यापेक्षा आपण जबाबदार नागरिक म्हणून निदान आपल्या समस्यांशी निगडित ट्रेंड्सचे challenge एकमेकांना केलेत तर या देशात कोणत्या समस्या आहेत याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होऊ शकेल. हा डेटा कलेक्ट केला तरी निदान समस्यांना वाचा फुटेल, सरकारला कळेल.

उदाहरणार्थ "मी बेरोजगार आहे, किंवा मी सरकारच्या अमुक तमुक योजनेशी शी असहमत आहे. मिडिया ने खोट्या बातम्या देणं थांबवावं, मला कृषी विधेयक मंजूर नाही. माझी नौकरी गेली आहे" वगैरे वगैरे सारखे ट्रेंड्स रुळवले जाऊ शकतात.

आपण आंधळे पणाने Trend followers होण्यापेक्षा डोळस पणे Trend setter बनावे आणि जबाबदारीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करावा असे माझे मत आहे.

Updated : 25 Sep 2020 7:47 AM GMT
Next Story
Share it
Top