Home > रिपोर्ट > #26/11 आईने लिहीलेलं मनोगत - छाया भागवत

#26/11 आईने लिहीलेलं मनोगत - छाया भागवत

#26/11 आईने लिहीलेलं मनोगत - छाया भागवत
X

तू घरीपर्यंत डोळ्याला डोळा नसायचा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे मयांकचे गुण लहानपणीच दिसत होते. मयांक बाबांसोबत टीव्हीवर मॅच पाहत असताना तोंडातल्या तोंडात बोलायचा. त्यावेळी मी ह्यांना नेहमी म्हणायचे की, मयांक मोठा झाल्यावर टीव्ही कॉमेन्टेटर होणार बघा. पुढे जाऊन तो मीडियामध्ये आलाच, रिपोर्टर पुढे अँकरिंगही केलंस तु. पण तू या क्षेत्रात यावं अशी माझी जराही इच्छा नव्हती. तू सीए व्हावंस ही माझी इच्छा होती.मुलांची आईसोबत जवळीक असते, पण आमच्याकडे उलटच होते सर्व. तुझं बाबांवर नितांत प्रेम, खूप सारं. तुझ्या करिअरबाबतचे निर्णय घ्यायचे म्हणजे तू आणि बाबाच ठरवायचे सर्व काही. झालं शेवटी मीडियामध्ये जाणं निश्चित झालं.

सहारा न्यूज चॅनेलमधील (दिल्ली) तुझा पहिला जॉब.तिथून मुंबईत आल्यानंतर तुझ्याकडे दोन पर्याय होते पहिला ई- टीव्ही आणि दुसरा स्टार न्यूज. ई टीव्हीमध्ये तू कधीही जॉईन होऊ शकत होतास. पण, मुंबईबाहेर आणि महत्त्वाचं म्हणजे आईपासून दूर राहायचं नव्हतं तुला. यासाठी स्टार न्यूज चॅनेलमधून बोलावणं येण्याची तू वाट पाहत होतास. दाराजवळ उभा राहून तू रोज पोस्टमन काकांना पाहायचास. अखेर लेटर आलं स्टार न्यूजमधून, लेटर पाहून तू आनंदानं निश्वास सोडल्याचं आजही मला आठवते.मी आधी म्हटल्याप्रमाणे मीडियामध्ये तुझं करिअर व्हावं,अशी मला अजिबात इच्छा नव्हती. न्यूज चॅनेलमध्ये लागल्यानंतर तुझी आणि आम्हा सर्वांची भेट तर टीव्हीवरच व्हायची. त्यातही तू कधी टीव्हीवर नाही दिसलास की वेगळंच वाटायचं, हिरमोड व्हायचा. कारण आपण प्रत्यक्षात कमीच भेटायचो. टीव्ही हे एकच माध्यम होतं तुला पाहण्याचं. तू घरी उशीरा यायचा, तेव्हा टेन्शन असायचं, कधी येणार तू?, काही खाल्लेलं असणार का? असे अनेक विचार डोक्यात ठेऊन तुझी वाट पाहत खिडकीजवळ बसायचे मी.

बाबा नेहमी म्हणायचे कशाला काळजी करतेस तो येणार व्यवस्थित. रेल्वे साखळी बॉम्बस्फोट आणि 26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी तर आमची झोपच उडाली होती. मैथिलीसारखी न्यूज चॅनेल पाहत होती. तू दिसतोय ना, तुझा आवाज ऐकू येतोय ना, हे आम्ही वारंवार तपासत होतो. ते तीन दिवस तर अक्षरशः मी रडून काढलेत. नकोसे झाले होते ते तीन दिवस. तीन दिवसांत तुझ्यासोबत बोलणं नाही की काही नाही. बाबा कुठून तरी माहिती काढून माझ्यापर्यंत पोहोचवत होते. तीन दिवस आंघोळपाण्याविना होतास तू. तुझं खाणं-पिणं नीट असेल ना याचीच काळजी सतावत होती मला. आई ना शेवटी.

26/11 हल्ल्यात जखमी झालेल्यांचे रक्त तुझ्या कपड्यांना लागले होते. हल्ल्याच्या दुस-या दिवशी रक्तानं माखलेल्या कपड्यांमधला तुझा फोटो पेपरमध्ये पाहिला. माझ्या बहिणीनं याची माहिती दिली, अगं मयांकचा फोटो पाहिलास का? फोटोमध्ये लिहून आलंय जखमी अवस्थेत माहिती देताना रिपोर्टर, असे कॅप्शन होतं त्या फोटोला. तुझा तो फोटो पाहून माझं टेन्शन आणखी वाढलं, शब्दांत सांगता येणार नाही.पण तुला काहीही झालेले नाही, तु सुखरुप आहेस, दुस-या जखमींना मदत करताना त्यांचे रक्त तुझ्या कपड्यांना लागलं, हे समजल्यानंतर जीव भांड्यात पडला. पण तू घरी येईपर्यंत डोळ्याला डोळा नव्हता. त्या हल्ल्याच्या कोणत्याही आठवणी घरात ठेवायच्या नाहीत हे मी तेव्हा कटाक्षाने सांगितलं. तुला बातम्या देताना, टीव्हीवर पाहताना अभिमान वाटायचा. पण अशा घटना, स्टींग ऑपरेशन वगैरे प्रकारांमुळे नेहमीच काळजीत असायचो.

पण आता फिल्ड बदललं आहेस त्यामुळे तेवढी काळजी नसते. तशी असते म्हणा पण थोडा निवांत आहे.लहानपणी मला तसा काही त्रास दिला नाहीस पण तुझ्यात आणि मैथिलीमध्ये वाद-भांडणं व्हायची. लहान मुलांना मारणं मला आवडत नाही त्यामुळे तुलाही कधी मारलं नाही. पण मोठा भाऊ म्हणून तुलाच प्रसाद मिळायचा. तुला फुटबॉल, क्रिकेट एकूणच स्पॉर्ट्समध्ये करिअर करण्याची इच्छा होती. आम्ही तुला नेहमी म्हणायचो की क्रिकेट खेळून काय पोट भरणार आहे का?. असे म्हणून तुला खेळात जाऊ दिलं नाही. तुला कदाचित याचा रागा असावा.बाकी स्वतःकडे लक्ष द्यावे, मदत करावी पण विचार करुन निर्णय घ्यावेत. ब-याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, शेअर करण्यासारख्या आहेत. पण सर्वच गोष्टी इथे मांडण्याला शब्दांच्या मर्यादा येतात.

आठवण म्हणून जपून ठेवलेली रक्ताळलेली जीन्स

Updated : 29 Nov 2019 4:51 AM GMT
Next Story
Share it
Top