विजयनानंतर सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
Max Woman | 24 May 2019 12:33 PM GMT
X
X
राजकारण आणि निवडणुका म्हटलं तर शरद पवार आणि बारामतीचं नाव घेतल्याशिवाय चर्चाच पुढे जाऊ शकत नाही. अशा या राजकारणाच्या पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक केलीय. तब्बल दीड लाखांनी त्यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केलाय. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली. 'श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!' या ओळी त्यांनी ट्वीट केल्यायत.
2014 मध्ये 2009 च्या तुलनेत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं होतं. त्यामुळं 2019 मध्ये काही दगाफटका होऊ नये यासाठी त्यांनी आधीपासूनच खबरदारी घेतली. पाच वर्षांत कार्यक्रम आणि भेटीगाठींसाठी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवण्यावर त्यांनी सुरुवातीपासूनच भर दिला. मतदारसंघातील समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. मतदारसंघातला बराचसा भाग हा दुष्काळी असल्यानं त्यादृष्टीनंही सुप्रियांनी पाऊलं उचलली. जिरायती भागात त्यांनी दौरे केले. इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले.
राज्यातले जे नेते सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात त्यात सुप्रिया यांचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्यांची स्वतःची सोशल मीडियाची यंत्रणा आहे. त्यामुळं तरुणांशी त्यांचा चांगला कनेक्ट तयार झालाय. सोशल मीडियावर मतदारसंघासोबतच राज्यातल्या विविध प्रश्नांवर सुप्रिया सुळेंनी कमालीची आक्रमकता दाखविली.
भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी यंदा बारामती काबीज करण्याचा चंग बांधल्यानं बारामतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजपाध्यक्ष अमित शाह, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा बारामतीत झाल्या. मंत्री चंद्रकांत पाटील हे तर तिथंच तळ ठोकू होते. सुप्रिया यांच्या विरोधात राजकारणातल्या नवख्या कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. क्लिन इमेज आणि महिला असल्यानं ही लढत रंगतदार बनली होती. पण बारामतीतलं राष्ट्रवादीचं संघटन, काँग्रेसची साथ आणि कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या बळावर सुप्रिया यांनी पुन्हा एकदा बारामती राखली आणि पवारांचा गड हा सहजासहजी जिंकता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.
Updated : 24 May 2019 12:33 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire