ग्रहण काळात अंघोळीसाठी पाणीपुरवठा नियमित करा; भाजप नगरसेविकेची अजब मागणी
X
पुण्यातील कोथरुड भागातील भाजपच्या (BJP) नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एक अजबच मागणी केली आहे. बुधवारी आलेली अमावस्या आणि गुरुवारी असलेलं सूर्यग्रहण (eclipse) संपल्यावर लोकांना आंघोळीसाठी पाणी लागेल असं म्हणत गुरुवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे.
खर्डेकर या कोथरूडच्या नगरसेविका आहेत. २६ डिसेंबर रोजी पुण्यातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल या चिंतेतून त्यांनी पाणीपुरवठा अन्य दिवशी दुरुस्त करावा अशी मागणी पत्राद्वारे महापौरांकडे केली आहे.
"२५ डिसेंबर रोजी दर्श अमावस्या असून दिनांक २६ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे. हिंदू धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असल्यानं गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी अशी आग्रही विनंती करत आहे." अशा आशयाचं पत्र त्यांनी महापौरांकडे दिलं आहे.
पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अशा शहरात लोकप्रतिनिधीच अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आहेत अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.