Home > Max Woman Blog > फेसबुक मदरहूड डेअर घेताना जरा विचार करा...

फेसबुक मदरहूड डेअर घेताना जरा विचार करा...

फेसबुक मदरहूड डेअर घेताना जरा विचार करा...
X

डार्विन आजच्या काळात जिवंत असता तर सोशल मीडियामुळे माणूस उत्क्रांतीची वाट उलटी चालायला लागलाय असं सिद्ध करण्याची इच्छा त्याला झाली असती इतका सोशल मीडियामुळे माणसांचा बुद्ध्यांक घसरत चाललेला सध्या दिसतो आहे. सामाजिक, वैयक्तिक, राजकीय, सांस्कृतिक बाबतीत आपल्या आयुष्यावर अनेक बाजूंनी सोशल मीडियाचा नको इतका प्रभाव दिसतो आहे.

यातलाच एक प्रकार म्हणजे मदरहूड डेअर चॅलेंज. (Facebook Motherhood Challenge) फेसबुकने २०१६ साली सुरू केलेला हा फोटो पोस्टीचा प्रकार अद्यापही वायरल आहे आणि तो महिलांमध्ये खूप प्रसिद्ध देखील आहे. भारतीय सोशल मीडियावर पुन्हा एकदा या मदरहूड डेअर चॅलेंजचं पेव फुटलेलं दिसतंय. या फोटो पोस्ट चॅलेंजच्या माध्यमातून महिलेकडूनच महिलेला उपरोधाने, भेदभावाने कमी लेखलं जातंय ही बाब दुर्दैवाने फार कमी टक्के स्त्रियांच्या लक्षात आलेली आहे.

वरवर पाहिलं तर आपल्या मुलांसोबत फोटो पोस्ट करणं ही एक गंमतीची, आनंदाची गोष्ट वाटू शकते, तशी ती आहे देखील मात्र एकिकडे आपल्या हे ध्यानीही येत नाही की या अशा गोष्टीतून तुमचं स्त्रीपण मोजलं जातंय आणि ते देखील केवळ मातृत्वाची फूटपट्टी लावून. आज करिअर, खडतर आयुष्य, संसार अशा अनेक गोष्टींचा समतोल करण्यासाठी धडपडणा-या स्त्रिया आजूबाजूला दिसतील. असं असताना फेसबुकवरील महिलांनी मदरहूड चॅलेंज स्वीकारून स्त्रीत्व म्हणजे केवळ मातृत्व हे नकळत मान्य करून स्वत:लाच कमी लेखून घेतलेलं आहे. एका चौकटीत स्वत:ला बसवलेलं आहे. स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव नसणा-या महिला बाळबोधपणे या मार्केटिंग गेमला बळी पडत आहेत. कारण त्यांच्या प्रत्येक पोस्ट आणि फोटोवरून त्यांची माहिती उत्पादक कंपन्याकडे पोहोचत असते हे अनेकींना माहित नसतं.

फेसबुक किंवा सोशल नेटवर्कींग माध्यमात आपली प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ, संवाद जाऊन तो डेटा उत्पादक कंपन्यांना विकला जातो. ही नवीन गोष्ट नाही. यातली अजून एक विसंगती म्हणजे चॅलेंज म्हणवताना स्त्रिया कुठेही त्यांना आईपण सांभाळताना आलेल्या अडचणींचे, आव्हानांचे फोटो टाकताना दिसत नाहीयेत तर यात केवळ आनंदी चेह-यांची आई-मुलं दिसताहेत.

आज आपण सर्वार्थाने स्त्री असण्याचा उत्सव, जागतिक महिला दिन साजरा करतोय. जगभरात तो साजरा होतोय. अशा वेळी एखादी महिला आई बनू शकली नाहीये, म्हणून आपण तिच्या स्त्री असण्याचा अधिकार नाकारू शकत नाही. मदरहूड चॅलेंजच्या माध्यमातून आज लाखोजणींनी कळत-नकळत त्यांच्या ओळखीतल्या काही कारणांनी आई न बनू शकलेल्या शेकडोजणींचा अवमान केलाय. याचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटले आहेत.

फेसबुकच्या या मदरहूड डेअरच्या विरोधात अनेक स्त्रियांनी त्या स्वत:च्या नात्यातली किंवा मित्र-मैत्रिणींची मुलं, पाळीव प्राणी, आई-वडील, स्वत:चे छंद यांची काळजी घेत असल्याचे फोटो पोस्ट केलेत. त्यांच्या मते या जबाबदा-या देखील आईपणाइतक्याच निस्सिम आहेत. तर काहींनी फेसबुकच्या या फोटो चॅलेंजला महत्त्व देऊन विनाकारण वाद का करा अशी भूमिका मांडलीय. फेसबुकसारखं लोकप्रिय माध्यम जाणूनबुजून जगभरातील महिलांमध्ये भेदभाव पसरवत असतानाही, त्यांच्यातील आई होण्याच्या क्षमतेवर बोट ठेवत असतानाही अनेक स्त्रियांनी याकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवल्याचं फेसबुकवरूनच जाहिर केलेलं आहे.

वरकरणी हळव्या वाटणा-या या फोटो पोस्ट्स अगदी सहजगत्या एखाद्या स्त्रीसाठी उपरोधिक, टीकात्मक ठरू शकतात. भारतासारख्या अजूनही मागासलेल्या प्रथा पाळणा-या देशात लग्न झाल्यावर बाईने मूल जन्माला न घालणं हा गुन्हा समजला जातो आणि त्यानंतर मूल व्हावं म्हणून अघोरी उपाय केले जातात. कित्येकींच्या वाट्याला केवळ मूल नाही म्हणून अनन्वित मानसिक आणि शारीरिक छळ येतो. बुवाबाबांकडून औषधोपचाराच्या नावाखाली त्या बाईवर बलात्कार केला जातो आणि मूल जन्माला घालून त्या बाईच्या नव-याचा शारीरिक दोष लपवला जातो. माझ्या माहितीत आजही काही जोडपी आहेत ज्यांनी आपलं मूल दत्तक आहे हे समाजात जाहीर केलेलं नाही.

आई होणं हा स्त्रीजन्माचा हक्क आहे, जबाबदारीच आहे, ते तुमचं सद्भभाग्यच आहे असं पिढ्यानपिढ्या आपल्या समाजात बायकांच्या मनावर बिंबवलं गेलंय. पाश्चात्य देशातही अगदी व्हिक्टोरीयन काळात स्त्रियांना मूलं जन्माला घालण्याचं यंत्र म्हणून पाहिलं जायचं. अनेक मुलं जन्माला घालून त्यांच्याच घोळात त्याकाळी महिलांना गुंतवून ठेवलं जायचं. भारतात तर आजही बाईवर गर्भारपण आणि तेही वारंवार (अनेकदा मुलगा होईपर्यंत) लादलं जातं.

गावाकडे मुलगा होत नाही तोपर्यंत सहा -आठ मुलींना जन्म देणा-या बायका मी पाहिलेल्या आहेत. कित्येक बायकांना गर्भनिरोधक काय असतं हे ही माहित नसतं. अनेकदा रेल्वे स्थानकांवर, रस्त्यांवर, कचराकुंडीत फेकलेली अर्भकं, मुद्दामहून हरवण्यासाठी म्हणून सोडून दिलेली मुलं सापडतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आईपणाचं मदरहूड चॅलेंज जर एवढं सोप्पं असतं तर ही मुलं त्यांच्या आईबापांकडून अशी फेकली गेली नसती.

मदरहूड चॅलेंजच्या गोंडस नावाखाली मुलांचा सर्व भार बायकांच्या डोक्यावर ठेवला जातो हे कित्येक घरात दिसून येतं. लग्न होऊन मूल जन्माला घातलं म्हणजेच तुझ्या स्त्री म्हणून जन्माला येण्याचं सार्थक झालं असं आजही कित्येक शिक्षित घरांतही मुलींना ऐकवलं जातं. फेसबुकमुळे आज अनेक महिलांच्या मुलांसमवेतच्या फोटोंवर शेकडो लाईक्स येत आहेत. अशा प्रकारांना लाईक्स देताना समाज म्हणून आपल्यातल्या स्त्रीला आणि भवतालच्या स्त्रीला काय मिळालं याचाही विचार जाणत्यांनी केला पाहिजे.

तुम्ही सांगा, १३ वर्षांच्या बलात्कारपिडित बालिका मातेने उद्या मदरहूड डेअरमध्ये फोटो पोस्ट टाकली तर तिच्यावर कितीजणांचे लाईक्स आणि किती कमेंट येतील? २०-२५ घरांची धुणीभांडी करून मुलांना शिक्षण देण्याचा आग्रह आणि धडपड करणा-या मोलकरणीने मदरहूड डेअरचा फोटो टाकलेला पाहिलाय का कधी?

दारू पिऊन झिंगून येणा-या नव-याकडून शारीरिक अत्याचार सहन करत दर वर्षाला पोरं जन्माला घालणा-या बाईचं मदरहूड डेअर कशात मोजाल तुम्ही? बिनालग्नाचं राहून कुमारिकेने जन्म देऊन मुलाला वाढवण्याचं धाडस केलं तर तिचं हे मातृत्व आपला समाज स्वीकारेल का? बारबालेने मदरहूड डेअर स्वीकारलं तर या मुलांचा बाप नक्की कोण असे प्रश्न तिच्या तोंडावर फेकले जातील.

फेसबुकने सुरू केलेल्या या फोटो पोस्ट चॅलेंजला पाश्चात्य देशातल्या सुधारक महिलांनी देखील विरोध केला इतका हा चॅलेंजचा प्रकार भंपक आहे. गेली चार वर्ष हा प्रकार सोशल मीडियावर सुरू आहे व भारतात पुन्हा एकदा मदरहूड डेअरचं वारं सुरू झालंय. मदरहूड चॅलेंजचे फोटो पोस्ट करण्यासाठी उत्तेजन देणा-या फेसबुकातले फोटो पाहाताना मला दुसरीकडे दिसतेय.

आपल्या बाळासाठी लढणारी दिल्लीची मौली निओगी आणि तिच्यासारख्या अनेक स्त्रिया. ज्यांना मॅटर्निटी लीवसाठी सुट्टी देताना कंपनीकडून पगार नाकारला जातोय. मौली निओगीला बाळंतपणाच्या रजेच्या काळात पगारही दिला गेला नाही शिवाय तिला जबरदस्तीने राजीनामा द्यायाला लावला गेला. आज तिने कंपनीविरोधात लेबर कोर्टात धाव घेतलीये. तिचा हा लढा म्हणजे खरं मदरहूड चॅलेंज आहे !

आज अनेकजणी आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी घेताना दिसतात. म्हातारपण हे दुसरं बालपण म्हटलं जातं. कारण या वृद्धांचाही शारीरिक असहायतेमुळे बाल्यावस्थेतील अगतिकतेकडे प्रवास सुरू असतो. कित्येक मुली आपल्या आई-वडिलांची अहोरात्र सेवा करतात. त्यासाठी त्यांना आईच व्हावं लागतं. सिंधूताई सपकाळांसारख्या ह्रषीतुल्य महिलांनी अनेक निराधार महिलांना आणि बालकांना आधार दिला. त्यांच्यासारखं कार्य अनेकजणी आपल्या अवतीभवती करतही असतील. त्यांचेही कष्ट या मदरहूड चॅलेंजमध्ये मोजले गेले पाहिजेत तर याला खरा अर्थ प्राप्त होईल.

आजकाल जिथे सरोगसीने मातृत्वाची प्रक्रिया विकली जाते, तिथे नेमक्या कोणत्या आईने मदरहूड चॅलेंज घ्यावं? आपल्या मतिमंद किंवा गतीमंद अथवा एखाद्या रोगाने पीडित, अपघाताने अधू झालेल्या पाल्याला जन्मभर सांभाळणारे कित्येक सोशिक माता-पिता समाजात दिसून येतात. या मातांचं मदरहूड डेअर तुम्हा-आम्हा गोंडस मुलांच्या आईपणापेक्षा निश्चितच थोर आहे.

खरं तर मदरहूड डेअरचे फोटो पोस्ट करणा-या स्त्रियांनी त्यांना आवडलेल्या आणि कठीण परिस्थितीत आईपण निभावणा-या मातांचे फोटो पोस्ट केले तर त्याद्वारे अशा मातांची माहिती इतरांना आदर्श ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात २.८ दशलक्ष गर्भवती स्त्रिया व अर्भकं दरवर्षी मृत्यू पावतात, एवढंच नाही तर दर ११ सेकंदाला एक गर्भवती किंवा नवजात शिशूचा जगात कुठल्यातरी कोप-यात श्वास थांबलेला असतो.

जागतिक लोकसंख्या अहवालानुसार भारतात दर मातेमागे बालक जन्म हे प्रमाण २.३०३ टक्के एवढं आहे. अनेक अडीअडचणीतून इथली प्रत्येकच माता तिचं आईपण आणि स्वत:चं अस्तित्व सांभाळते. या देशात उत्तरप्रदेशसारख्या राज्यात रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपल्यावर मुलं मरतात त्या मातांचं दु:ख, त्याचं जगण्यातलं धारिष्ट्य हे खरं मदरहूड चॅलेंज म्हणायला पाहिजे. अनेकींची मुलं दगावतात, कित्येकदा मृत मुलांची आठवण काढत त्या पुन्हा मुल जन्माला घालतात. या मातांचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या देशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांना वेशीवर टांगलं जातं, चालत्या वाहनात बलात्कार करून रस्त्यावर फेकलं जातं अशा मुलींच्या आई मुलीच्या आठवणीत रोज मरतात तरीही मुर्दाड व्यवस्थेशी लढा देतात, अशा आईचं मदरहूड डेअर कोणत्या मोजपट्टीत मोजणारेय हे सवंग फेसबुक चॅलेंज?

प्रसिद्ध कादंबरीकार स्रीमोई पियू कुंडू यांनी देखील फेसबुकच्या मदरहूड चॅलेंजविरोधात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, “केवळ मातृत्व म्हणजे स्त्रीला मिळालेले पूर्णत्व नाही. तर स्त्रीच्या अनेक सामर्थ्यांपैकी ते एक आहे आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करताना मातृत्व हिच फक्त स्त्रीची महान शक्ती आहे असं अवास्तव स्वरूप त्याला देण्याची काही एक गरज नाही. स्त्रियांना अनेक कारणांपायी गर्भपात करावा लागतो किंवा तो नैसर्गिकरित्या घडतो.

वारसा चालवण्याची शक्ती त्यांच्यात आहे. स्त्रिया दत्तक घेऊ शकतात, अनाथांचं पालन करू शकतात. महिलांना मूल हवं की नको हे ठरवण्याचा हक्क आहे. तरीही कधीकधी त्यांच्यांवर गर्भारपण लादलं जातं. प्रसूतीनंतर महिलांना नैराश्यालाही सामोरं जावं लागतं. अनेकदा गर्भाशयाच्या विकारांनी त्यांच्यातल्या आई बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अनेक स्त्रिया या त्यांच्या स्वत:च्या मुलांप्रमाणेच त्यांची भाचरं, पुतणे, पाळीव प्राणी, पालक, मित्र आणि प्रेमिकालाही आईप्रमाणेच प्रेम देऊन सांभाळतात.

महिलांना मासिक पाळी जातानाही नैराश्य येतं. मूल होण्यासाठी त्या अनेक तंत्रज्ञानांचा आधार घेतात. अगदी गर्भाशयही दत्तक घेतात. स्त्रियांचं मुलांवर प्रेम असतंच. त्या स्वत: माता असोत किंवा नसोत. मातृत्व ही काही स्त्रीत्वाची सक्तीची प्रातिनिधिक निशाणी नाही, जी प्रत्येक स्त्रीने दाखवून दिलीच पाहिजे. आपण एकमेकांचा आदर करू. आणि लाखोजणी स्वत:च्या मातृत्वाचा बहुमान करत असताना आपल्याला प्रेमाचे व ममतेचे अनेक आविष्कार दाखवणा-या आपल्या भवतालच्या बहिणी, काकी, कन्या, नाती, मैत्रिणी, महिला बॉस, सहकारी, शेजारणी अशा प्रत्येकीचा सन्मान करू. निसर्ग बाईचं आई होणं ठरवतो. पण मी काळजीने केलेल्या संगोपनाला कधीही प्रथम महत्व देईन. लिंगभेदाने अंतर वाढतं. जबाबदारी, काळजी, दयाळूपणा, सहानुभूती, देखभाल या सर्वांमुळे आपण आज एकत्र आहोत.”

तुम्ही आई म्हणून खूप छान कर्तव्य निभावत असाल. आईपणाचा आनंद हा वेगळाच आणि अतुलनीय असतो. हे सर्वच जाणतात आणि हे निर्विवाद सत्य आहे. परंतु आपल्या आईपणाची महती गाताना आपण नकळत आपल्या आजूबाजूच्या आई होण्यापासून वंचित राहिलेल्या कोणा स्त्रीला दुखावत तर नाही ना याचाही विचार करणं जरूरी आहे. मुळात मदरहूड चॅलेंज हा मातृत्व भावनेला बाजारू महत्त्व देण्याचा फेसबुकचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रत्येक नव्या सादरीकरणात त्यांचं आर्थिक गणित दडलेलं असतं.

मदरहूड चॅलेंजच्या सोबतीने गर्भारपण, प्रसूती, मातृत्व आणि पालकत्व अशा अनेक क्षेत्रातील उत्पादन कंपन्यांना त्यांची गि-हाईकं समोर उभी करून देण्याचा हा फेसबुकीय मार्ग. फेसबुक काय किंवा गुगल काय, तुमचा सर्व डेटा उत्पादन कंपन्या किंवा काही अज्ञात कंपन्यांकडे पोहोचवला जातो. मात्र याची कल्पना नसलेल्या कित्येक स्त्रियांना आपण फेसबुकवर मदरहूड चॅलेंजचे फोटो टाकताना अजाणतेपणे त्यांच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील, ओळखीच्यांपैकी मूल नसलेल्या महिलांना दुखावत आहोत याची जराही जाणीव होत नाही.

भारतात स्त्रीजन्म म्हणजे मूल जन्माला घालणं हे अगदी ‘बाईच्या जन्माला चूल आणि मूलच’ यासारख्या म्हणींपासून बायकांच्या मनावर कोरलं जातं. परंतु निव्वळ आई होण्यात धन्यता न मानता स्त्री म्हणून आपलं सक्षमीकरण किती झालं, विकास किती झाला याचा विचार महिलांनी केला पाहिजे.

विशाखा शिर्के

(लेखिका माजी पत्रकार असून त्यांनी टेलीव्हिजन, प्रिंट, वेब व रेडिओ माध्यमात १९ वर्ष पत्रकारिता केलेली आहे. सध्या लेखन-संपादन करतात.)

Updated : 8 March 2020 4:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top