Home > Max Woman Blog > WorldBreastfeedingWeek : जेव्हा आईला दूधाचा पान्हा फुटतो...

WorldBreastfeedingWeek : जेव्हा आईला दूधाचा पान्हा फुटतो...

WorldBreastfeedingWeek  : जेव्हा आईला दूधाचा पान्हा फुटतो...
X

बाई बाळंतिण झाली की अर्ध्या तासाच्या आत लेकराला अंगावरचं दूध पाजावं रोगप्रतिकारक शक्ती असणारं हे दूध म्हणजे पहिलं दूध चिकाचं अमृत ठरे बाळास असं असतं. पहिल्या बाया हे दूध लेकरांना पाजत नसत त्याऐवजी शेळीचं गायीचं दूध कापसाच्या बोळ्यानं पाजत असत कालांतराने केंद्राच्या एन आर एच एम या कार्यक्रमातून अवेअरनेस आणि शिक्षित झाल्याने आता अंगावरचं दूध महिला लेकराला पाजत आहेत.

साधारणपणे नैसर्गिक बाळंतपण(खाली टाके न पडता) झाले तर अंगावरचं दूध पाजणं लवकर शक्य होतं पण सिझेरियन झाले तर मग अंगावरचं दूध पाजणं जरा अवघड जातं. पण बाळंतपण नैसर्गिक होवो किंवा सिझेरियन ने बाळंतिणीला “पान्हा” फुटताना फार त्रास होतो.

यात साधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पान्हा फुटतो (दूध येत) हा पान्हा फुटताना पाठीतून मुंग्या निघतात म्हणजे सगळ्या नसा एकत्र झाल्यात कुठेतरी असं होतं भयंकर सनसन ताप येतो आणि मग तो पान्हा फुटुन दूध येतं. असं म्हणतात की, बाईच्या आणि गाईच्या स्तनातून बत्तीस धारा वाहत असतात. सुरवातीचं दूध बाळंतिणीला जास्त येतं आणि लेकराची भूक कमी असते, सारखं लेकरू झोपत असतं दर दोन तासांनी लेकराच्या पायाला टिचकी मारून ऊठवत ते दूध पाजावं लागतं. कधी कधी लेकरू एकाच छातीचं दूध पीतं आणि त्याची भूक भागते असा पान्हा बाईला कमीतकमी दिड वर्षापर्यंत येतो.

बाळंतिणीला येत असलेला पान्हा हा एवढा जास्त असतो की ते दूध लेकराला पाजुन उरतं त्या दूधाच्या स्तनात गाठी होतात या गाठी नाही काढल्या तर बाळंतिण बाई आजारी पडते. म्हणून बाळंतिण लेकराला दूध पाजत असताना पान्हा आला की, दुसरे स्तन उघडे ठेऊन एका स्वच्छ कपड्यावर पडणाऱ्या दुधाच्या धारा त्यावर किंवा चुलीतील थंड राख तव्यावर ठेवत त्यावर ते दूध पिळावं लागतं. तेव्हा बाळंतिण बाई मोकळी रहाते. एक स्तन दूधाचं आणि एक स्तन पाण्याचं असतं यामुळे डाव्या स्तनाला लेकराला पाजू दिलं जात नाही उजव्या स्तनालाच पाजवले जाते. पण असं काही नसतं हा गैरसमज असतो.

आमच्या लहानपणी आम्ही ऐकायचो की, एखाद्या बाळंतिणीला जर नवऱ्याने मारलं तर तिचं दूध उडत असतं पान्हा अटत असतो यामुळे वल्या बाळंतिणीला हाणमार करायची नसते कारण मानपाठ एक होऊन दूधाचा पान्हा फुटत असतो. यामुळे लेकराला दूध पाजताना बाळंतिणीची माय बाळंतपणात पाठीवरून मायेचा हात फिरवत असते. पण बाळंतिणीची आई जवळ नसेल तर सासू नेही असा हात फिरवावा नसेल शक्य तर नवऱ्याने असा पाठीवर हात फिरवत तिच्या आहाराची आरामाची काळजी घेतली तर बाळंतिणीला धमाधमा दूध येईल तिला भावनिक आधार भेटेल लहान मुलं हेल्दी रहातील.

(असाच एक नवरा करोनामुळे बायको माहेरी न गेल्याने[तसंही माहेरीच बाळंतपण करावं असं काही नसतं] तिच्या पाठीत मुंग्या निघत असल्याने पाठ चोळत मायेचा हात फिरवताना)

  • सत्यभामा सौंदरमल

    बीड

Updated : 3 Aug 2020 2:04 AM GMT
Next Story
Share it
Top