Home > Max Woman Blog > स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!

स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!

स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!
X

खरंतर, आपण लिहिणारी मंडळी म्हणजे अधिक संवेदनशील. त्यातही लिहिता माणूस काळाच्या पुढे विचार करत असतो. असं गृहीत धरलं तर आपण विवेकी, पुरोगामी. अर्थातच परिवर्तन, बदल, यांवर विश्वास ठेवून काम करणारे. जगणारे. म्हणजे जबाबदारी आणखीच वाढली. अशा परिवर्नशील परीघात स्त्री-पुरूष समानतेचा आपला आग्रह असतो. तसं लेखणीतूनही मांडत असतो. मांडलंच पाहिजे. मग नवं जग घडवू बघताना 'स्त्री-पुरूष' याहीपलिकडे 'माणूस' म्हणून समोरच्याकडे बघायचं कसं काय विसरतो? एकीकडे माणूसपणाची झेप घेणारं साहित्य निर्माण करणारे 'आपण' दुसरीकडे स्त्री-पुरूष नात्याला (Male female relationship) सवंगपणे कसं काय बघू शकतो ? म्हणजे पूर्वग्रहदूषित नजरेने आपण आपल्याकडेच बघतोय का ? एकदा सगळं नीटपणे तपासून बघायला हवं.

स्त्री-पुरूष नात्यात 'माणूस'पणाची घट्ट पकड रूजवण्याचा मानस असताना, वर्षानुवर्षे त्याच त्याच संबंधाना चघळून बेचव झालेल्या चोथ्याचा आरोप करताना, आपल्या भूमिकेत नेमकी गडबड कुठे होतेय याचाही पडताळा घ्यायला हवा. अशावेळी लेखक, कवी म्हणून आपली संवेदनशीलता नेमकी कशी असते? की नसतेच? एरवी साहित्यातून 'स्त्री-पुरूष' नात्याचा सूक्ष्मपणे वेध घेणारे, कंगोरे तपासणारे आपण प्रत्यक्ष लोकांत वावरताना संकुचित कसे होऊ शकतो? सरळसोट 'लेबल' लावणं कसं काय जमू शकतं ?

या सगळ्यातून बाहेर यायला हवं. लेखक म्हणून बायडिफाॅल्ट आलेलं पुढारलेपण नुसतं मिरवून कसं चालेल तसं जगावंही लागतं. बाई-पुरूष याभोवती कल्पिल्या जाणाऱ्या सपक गोष्टींच्या खूप पुढे जाऊन पुन्हा मागे फिरून बघावं.

कदाचित 'स्त्री-पुरूष' नात्यात वर्षानुवर्षे हिणवलेल्या, चघळलेल्या वा तिरस्काराने बघितल्या गेलेल्या बेढब चौकटी पार जमीनदोस्त झालेल्या दिसतील.

बघा, जमलं तर पारंपारिक नजरेची जळमटं काढून माणूसपणाच्या प्रवाहात येऊया. साहित्यनिर्मिती, जतन, संवर्धन आपल्यालाच करायचंय. सोपं नाहीए. माझं लेखन कागदावर उतरलं तरी माझी सामाजिक बांधिलकी कागदापुरती मर्यादित राहत नाही. म्हणूनच निर्मिती करत असताना माझ्यातली साहित्यिक कार्यकर्ती खारीचा वाटा उचलत काम करते. वेळ आणि परिश्रम आनंदाने गुंतवते. तेव्हाही मी स्त्री नसून फक्त माणूस असते. आपणच माणसाचं साहित्य 'माणूस' बनून सांभाळायला हवं !

विनम्रता म्हणजे मजबुरी नाही हे ही ध्यानात असावं.

मेत्ता टू ऑल

- वृषाली विनायक

Updated : 18 Jun 2020 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top