कोरोना टेस्ट किट संशोधनात आणखी एका महिलेची भरारी
X
देशातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म देणाऱ्या पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले या तुम्हाला माहितच असतील. मात्र, आता त्या पुढे संशोधन करत फक्त १५ मिनिटात कोरोना विषाणूचं निदान करता येणाऱ्या टेस्ट किटची निर्मिती करत पुन्हा एका महिलेने देशाच्या संकटकाळात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
कोरोनाची व्हायरसची लागण झाली की नाही याचं निदान फक्त १५ मिनिटात करणाऱ्या 'टेस्ट किट'चा शोध लागला आहे. पुण्यातील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीकडून या किटची निर्मिती करण्यात आलीय. विशेष म्हणजे या निर्मितीत महिला संशोधक शितल रंधे-महाळुंकर यांचं मोठं योगदान आहे. या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यात मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर, देशभरातील राज्यातही महाराष्ट्र चिंताजनक परिस्थितीत आघाडीवर आहे. या लढाईत कोरोना विषाणूची चाचणी करणाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टेस्ट किटची मोठी कमतरता भासते आहे. मात्र, देशावर आलेल्या संकटकाळात संशोधनातून देशाची सेवा केल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होते आहे. आता फक्त १५ मिनिटात विषाणूच्या प्रादुर्भावाचं निदान कऱणारे किट फारच उपयोगी पडणार आहेत.
या संशोधनात प्रमुख म्हणुन काम करणाऱ्या शितल रंधे यांचं सध्या फारच कौतुक होत आहे. पुण्याच्या कुसगाव येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास (रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट) विभागात त्या प्रमुख आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. शितल रंधे यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे, अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ, अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली. प्रथम किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताबाहेरुन मागविला. लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास थोडा विलंब झाला. तरीही जास्त वेळ मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली आहे.
किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या. दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होणार आहे.